स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार ही मालिका गेल्या काही दिवसांपूर्वी अडचणीत आली होती. मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी लक्ष्मीची भूमिका निभावली होती मात्र सेटवर मानसिक त्रास आणि हीन दर्जाची वागणूक दिल्याच्या कारणावरून त्यांनी ही मालिका सोडली होती. किशोरी अंबिये , सुनील बर्वे, नंदिता पाटकर आणि या मालिकेच्या दिग्दर्शकाने मला खूप त्रास दिला असे म्हणून त्यांनी पोलीस चौकीत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. इतके दिवस होऊनही या तक्रारीवर पोलिसांनी अजून कुठलीच कारवाई केली नसल्याची एक खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मला पाठिंबा दर्शविलेल्या सर्वच लोकांचे मी आभार मानते असे म्हणून या तक्रारीबाबत त्या म्हणतात की, २२ नोव्हेंबर २०२१ रोजी मी दादरच्या पोलीस चौकीत या सर्वांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी माझं स्टेटमेंट लिहून घेण्यात आलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच मी पोलीस चौकीला जाऊन भेट दिली त्यावेळी मी दिलेल्या तक्रारीवर अजून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. पण मला ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिला आहे त्यासर्वांचेच मी मनापासून आभार मानते. माझ्यावर जो अन्याय झाला त्याच्यावरच मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. मी एक उदाहरण म्हणून लोकांसमोर बोलू शकले किमान या माध्यमातून तरी ज्या कोणत्या कलाकारांवर असे प्रसंग घडत आहेत त्या सर्वांनी समोर येऊन बोललं पाहिजे, आपल्याला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही असे म्हणून गप्प राहणे चुकीचे आहे. अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेच्या कलाकारांवर मानसिक त्रास दिल्याचे आरोप लावले त्यावेळी सुनील बर्वेने प्रतिक्रिया दिली होती की , अन्नपूर्णा यांनी मालिका सोडली हा सर्वस्वी त्यांचा निर्णय होता. आमच्यावर आरोप करून त्या लोकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनील बर्वेच्या या प्रतिक्रियेला देखील अन्नपूर्णा यांनी रोखठोख उत्तर देत म्हटले आहे की, मी हिंदी इंडस्ट्रीत गेल्या २५ वर्षांपासून काम करत आहे. मोठमोठ्या कलाकारांसोबत मी काम केलं आहे, मोठमोठे दिग्दर्शक, मोठमोठ्या निर्मात्यांसोबत मी काम केलं आहे. मला जर कोणावर आरोप करायचेच असते तर मी त्या मोठमोठ्या कलाकारांवर केले असते….तुमच्यावर असे आरोप करून मला काय मिळणार होतं? माझा कुठला फायदा होणार होता? मी तुमच्यासारख्या लोकांकडून का सहानुभूती मिळवू? मला जो त्रास झाला त्यालाच मी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे अन्नपूर्णा यांनी म्हटले आहे.

दरम्यान अन्नपूर्णा यांच्या पाठोपाठ काही दिवसांनी मालिकेतील आणखी एका कलाकाराने स्वाती भादवे हिने प्रॉडक्शन कंट्रोलर बंटी लोखंडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. काम मिळवून देतो त्याबदल्यात त्याने स्वातीकडे शरीर सुखाची मागणी केली होती. त्याच्याविरोधात तक्रार दाखल होताच बंटीला पोलिसांनी अटक केली होती. तीन दिवस त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असल्याचे अन्नपूर्णा म्हणतात. त्यानंतर मला कॉस्ट्युम डिपार्टमेंट च्या अश्विनीची प्रतिक्रिया आली होती की तिच्या देखील चारित्र्यावर बोट ठेवण्यात आले होते तेव्हा तिनेही काम सोडून दिले होते. तिने हे मला कमेंट करून सांगितले त्यावेळी मालिकेच्या टीम ने तिला खूप बोलले होते. एका मुलाच्या बाबतीत देखील हऱ्यासमेन्ट झाल्याचं त्यांनी पुर्याव्यानिशी दाखवलं. अन्नपूर्णा यांनी एका व्हिडिओत त्यांच्या विरोधात झालेल्या प्रतिक्रिया प्रिंट करून लोकांना दाखवल्या आहेत. मी जो आवाज उठवला त्यात माझं काही चुकलं का? असं त्या म्हणाल्या आहेत. माझी फक्त एवढीच ईच्छा होती की, ह्या लोकांनी माझी माफी मागावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी. मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे यावर तुमचं काय मत आहे ते मला जाणून घ्यायचं आहे असं अन्नपूर्णा म्हणतात…