स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेला गेल्या काही दिवसांपासून गालबोट लागलेले पाहायला मिळत आहे. मानसिक त्रास दिला जातोय असे म्हणत ज्येष्ठ अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेच्या कलाकारांवर आरोप लावले होते. ही घटना निवळते न निवळते तोच आता मालिकेतील अभिनेत्रीने प्रॉडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडे(बंटी) विरोधात गंभीर आरोप लावले आहेत. या अभिनेत्रीचे नाव आहे स्वाती भादवे. स्वाती भादवे ही गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी तसेच मराठी मालिका सृष्टीत काम करत आहे.

सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत स्वाती नंदिता पाटकर यांची बॉडी डबल भूमिका साकारत असे. म्हणजेच ज्यावेळी मालिकेत नंदिता पाटकर यांचा सिन असायचा त्यावेळी त्यांच्या अनुपस्थित स्वाती नंदिता पाटकरची भूमिका साकारायची. नंदिता पाटकर यांना काही कारणास्तव सेटवर यायला उशीर होत असेल तेव्हा त्यांचे काम स्वाती करायची. स्वाती सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून काम करत आहे. स्वप्नील लोखंडेने काही दिवसांपूर्वी स्वातीकडे तिचा फोन नंबर मागितला होता आणि पुण्यात काम करशील का म्हणून तिला विचारले होते. अजून एक मालिका मिळतेय या विचाराने स्वाती ने त्याला फोन नंबर देऊ केला आणि तुझे काय कमिशन असेल तेही मी देण्यास तयार आहे असे त्याला आश्वस्त केले. मात्र स्वप्नील ला कमिशन नव्हते पाहिजे मालिकेत काम देण्याच्या बदल्यात त्याने स्वातीकडे शरीर सुखाची मागणी केली होती असे स्वातीने स्पष्ट केले. स्वप्नीलच्या या मागणीवर स्वातीने गोरेगाव पोलीस चौकीत जाऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

स्वप्नील विरोधात तक्रार दाखल करताच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याला ३० नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते. स्वाती भादवे हिने सहकुटुंब सहपरिवार या मालिकेव्यतिरिक्त मोलकरीण बाई, फुलाला सुगंध मातीचा, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, हे मन बावरे, सुखी माणसाचा सदरा, स्वराज्यजनानी जिजामाता यासारख्या गाजलेल्या मराठी मालिकांमधून स्वातीला छोट्या छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. क्राईम पेट्रोल आणि अशाच काही हिंदी मालिकेतूनही तिला अभिनयाची संधी मिळाली होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या स्वातीला कलासृष्टीत येण्यासाठी मोठा स्ट्रगल करावा लागला होता त्यानंतर हळूहळू मालिकेतून तिचा जम बसत गेला. मात्र तिच्यासाठी आलेला हा अनुभव फारच धक्कादायक होता असे ती म्हणते.