मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्याचे थाट सजलेले पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला. रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्ये लग्नबांधनात अडकणार असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. आता आणखी एक लाडका अभिनेता लवकरच विवाहबद्ध होत असल्याचे समोर आले आहे. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील सर्वांचा लाडका पश्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे आणि त्याची खास मैत्रीण रुचीका धुरी यांचा देखील नुकताच साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या साखरपुड्याला सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना आकाश नलावडेने अभिनय क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले. याअगोदर त्याने अनेक मालिकेतून छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या परंतु एका ठराविक भूमिकेमुळे कलाकाराला ओळख मिळते ही ओळख त्याला मिळवून दिली सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील पश्याच्या भूमिकेने. त्याने साकारलेला पश्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आकाश नलावडेने पुण्यातून आपले शिक्षण पूर्ण केले इथेच त्याला अभिनय क्षेत्राची ओढ लागली आणि त्याने स्वतःहून अभिनयाचे बारकावे शिकण्याचा निश्चय केला. पुण्यातील ललित कलाकेंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवत असताना नाट्यस्पर्धा, एकांकिका मधून अभिनयाची संधी मिळाली. स्पेशल पोलिसफोर्स, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा मालिका तसेच व्यावसायिक जाहिरातींमधून त्याने मॉडेलिंग देखील केले. परंतु म्हणावी तशी प्रसिद्धी त्याला मिळत नव्हती. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून आकाशला पश्याची भूमिका मिळाली. गावरान भाषेचा बाज आणि त्याच्या निरागसपणामुळे पश्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ही त्याच्या आयुष्यात अधोरेखित करणारी भूमिका ठरली.

याच कारणामुळे मालिकेतील अंजी आणि पश्याची जोडी प्रेक्षकांना विशेष भावलेली पाहायला मिळते. या दोघांची नोकझोक मालिकेतून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करते .प्रेक्षकांचा हा लाडका पश्या रिअल लाईफमध्ये त्याची खास मैत्रीण रुचिका धुरी सोबत लग्न कधी करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आकाशने त्याच्या साखरपुड्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका व्हिडिओत गुडघ्यावर बसून अगदी सिनेस्टाईलने आकाशने रुचिकाला प्रपोज करत बोटात अंगठी घातलेली पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने त्याच्या चाहत्यांनी तसेच सहकलाकारांनी अभिनेता आकाश नलावडे आणि त्याची खास मैत्रीण रुचीका धुरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.