बऱ्याच प्रतीक्षेनंतर सागर कारंडेची टीव्ही माध्यमातून एन्ट्री… आजारपणानंतर बदलेल्या सागरला पाहून प्रेक्षक भावुक
चला हवा येऊ द्या शोला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या कलाकारांमध्ये सागर कारंडेचाही मोठा वाटा आहे. सागर कारंडे जेव्हा चला हवा येऊ द्या या शोमध्ये होता तेव्हा तेव्हा तो पुणेकर बाई, मिमिक्री आर्टिस्ट म्हणून लोकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसला. महत्वाचं म्हणजे त्याने साकारलेला पोस्टमनकाका प्रेक्षकांना भावुक करून गेला. मात्र त्यानंतर सागर कारंडे या शोमधून काढता पाय घेताना दिसला. त्याने साकारलेला पोस्टमनकाका जेव्हा श्रेया बुगडे साकारू लागली तेव्हा मात्र लोकांनी तिला कडाडून विरोध केला. पोस्टमनची जागा सागर कारंडे शिवाय कोणीच घेऊ शकत नाही अशी मागणी करण्यात येऊ लागली. तेव्हा श्रेया बुगडेने देखील प्रेक्षकांचा विरोध पाहून पाय मागे घेतला. पण आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर सागर कारंडे पुन्हा एकदा पोस्टमन काकांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
झी मराठीच्या ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये सागर कारंडे पोस्टमन बनून घरातील सदस्यांना भावुक करताना दिसणार आहे. जाऊ बाई गावात या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक गेले कित्येक दिवस आपल्या आईबडीलांपासून दूर आहेत त्यामुळे त्यांची पत्र घेऊन हा पोस्टमन काका त्यांना घरच्यांचा संदेश द्यायला येणार आहे. तर शोचा सूत्रधार हार्दिक जोशी यालाही त्याच्या जवळच्या व्यक्तीचे खास पत्र मिळणार आहे. जाऊ बाई गावात हा शो सुरू होण्यापूर्वी हार्दीकच्या वहिनीचे दुःखद निधन झाले होते. तो त्याच्या वहिनीच्या खूपच क्लोज होता त्यामुळे वहिनीच्या या पत्राने हार्दीकच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले पाहायला मिळणार आहेत. सागर कारंडे त्याच्या खास अंदाजात ही पत्र पुन्हा एकदा वाचून दाखवणार आहे . इतक्या दिवसानंतर सागरला पुन्हा एकदा पोस्टमन काकांच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांनी त्याचे स्वागतच केले आहे.
मधल्या काळात सागर कारंडे त्याच्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त होता. याचदरम्यान सागर प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता तेव्हा अनेकांनी त्यांच्या प्रकृती बाबत मोठी काळजी व्यक्त केली होती. यावेळी जेवण, अपुरी झोप यामुळे सागर कारंडे चक्कर येऊ पडला होता. तेव्हा त्याला हृदविकाराचा झटका आल्याची अफवा पसरली होती. पण जागरणामुळे आणि ऍसिडीटीच्या त्रासामुळे त्याला चक्कर आली असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले होते. या बातमीनंतर सागरला चला हवा येऊ द्या मध्ये परत बोलवा अशी मागणी करण्यात आली. पण आता चला हवा येऊ द्या नाही तर जाऊ बाई गावात मधून सागर कारंडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आला आहे. इतक्या दिवसानंतर सागरला पुन्हा एकदा पाहून त्याच्या दिसण्यात प्रेक्षकांना बराचसा फरक जाणवला. म्हणूनच प्रेक्षकांनी त्याच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे तसेच त्याला चला हवा येऊ द्या मध्ये आणण्याची मागणी केली आहे.