आज १६ ऑगस्ट अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा वाढदिवस. नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटातून सुप्रिया पिळगावकर पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात दाखल होत आहेत. २० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन सुप्रिया हे मराठी सृष्टीतील एक लाडकं जोडपं म्हटलं तर वावगं ठरायला नको. २१ डिसेंबर १९८५ मध्ये त्यांनी लग्न केलं त्यांच्या या संसाराला आता जवळपास ४० वर्षे झाली आहेत. या दोघांची पहिली भेट कशी आणि कुठे झाली हे जाणून घेऊयात.
सचिन पिळगावकर हिंदी चित्रपट सृष्टीत व्यस्त होते. त्यादरम्यान नवरी मिळे नवऱ्याला या मराठी चित्रपटासाठी ते एका नायिकेच्या शोधात होते. एके दिवशी सचिनजींच्या आई ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर किलबिल बघत होत्या. त्यात सुप्रियाला पाहून सचिनजींच्या आईने तिचे नाव त्यांना सुचवले. सुप्रिया सबनीस असं टीव्हीवर तिचं नाव पाहिलं तेव्हा ‘हीच्याशीच तू लग्न कर’ असं त्यांच्या आई त्यावेळी बोलल्या होत्या. दोन दिवसानंतर एका पेपरमध्ये तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाच्या जाहिरातीत सचिनजींनी सुप्रिया सबनीस हे नाव पुन्हा एकदा वाचलं. त्यानंतर या मुलीला भेटायचं म्हणून नाटकाचे सर्वेसर्वा मधुकर तोरडमल यांच्याकडून दोन तिकिटं मिळवली. सतीश कुलकर्णी आणि सचिनजी दोघेही नाटक बघायला गेले तेव्हा मात्र सुप्रियाची भेट झाली नाही. पण नाटकात तिचा वेगळा लूक पाहून सचिनजींनी वेगळ्या नायिकेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पल्लवी जोशी ही त्यावेळी खुपच लहान होती. तिला तीन चार वेळा साडी नेसवून बघितली तेव्हा ती त्या भूमिकेसाठी खुपच लहान दिसू लागली. शेवटी सुप्रियाच्या नावाचा पुन्हा विचार करण्यात आला. “२४ ऑक्टोबर १९८३ ही तारीख माझ्या अजूनही लक्षात आहे जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं” असे सचिन पिळगावकर सांगतात.
याच दिवशी स्टुडिओत त्यांची पहिली भेट झाली आणि पाहताक्षणी सचिनजी सुप्रियाच्या प्रेमात पडले. पण हे आताच कसं बोलणार? म्हणून सचिनजी शांत राहिले. चित्रपटासाठी अगोदर काम केलं नसल्याने सुप्रियाने वडिलांशी बोलण्यास सांगितले. त्यानंतर २१ एप्रिल १९८४ ला चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. शूटिंग आटोपल्यानंतर सचिनजींनी सुप्रियला प्रपोज केलं तेव्हा ‘तुमचं (नक्की) लग्न नाही झालं अजून?’ असा प्रश्न विचारला. यावर सचिनजींनी ‘झालं असतं तर विचारलं असतं का तुला’ असं उत्तर दिलं. पण त्यानंतर हो, नाही करत त्यांनी लग्नाला होकार दिला. चित्रपट रिलीज झाला त्यानंतर २१ एप्रिल १९८५ ला साखरपुडा झाला त्यानंतर२१ डिसेंबर १९८५ ला लग्न झालं. लग्नाचा हा दिवस सुप्रिया यांच्यासाठी खुपच कठीण होता कारण त्यावेळी त्या अवघ्या १८ वर्षांच्या होत्या. आई वडिलांना सोफुं जायचं या विचारात त्या गुंगल्या होत्या. आपण काय करतोय ,कुठे जातोय या विचारानेच त्यांना पाठवणीवेळी खूप रडू कोसळले होते.