सोशल मीडियावर सध्या हे क्युट कपल मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी एकत्रित गायलेली गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून चाहत्यांची मने जिंकून घेताना दिसत आहे. आज हे व्हायरल होत असलेलं कपल नेमकं आहे तरी कोण याबाबत जाणून घेऊयात… फोटोतील या दोन्ही कलाकारांची नावे आहेत “साचेत टंडन” आणि “परंपरा ठाकूर”. साचेत आणि परंपरा हे दोघेही गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. आजवर या दोघांनी अनेक गाणी एकत्र गायली आणि संगीतबद्ध केली आहेत. टॉयलेट एक प्रेम कथा, बत्ती गुल मीटर चालू, कबीर सिंग, तान्हाजी अशा चित्रपटांची गाणी त्यांनी गायली आहेत.

बेखयाली, सायको सय्या अशी बरीच लोकप्रिय गाणी वेगवेगळ्या मंचावर त्यांनी गायली आहेत. बॉलिवूडमध्ये हे क्युट कपल सध्या आपल्या गाण्यांमुळे जोरदार चर्चेत आले आहे. साचेत आणि परंपरा यांची लव्हस्टोरी देखील त्यांच्या गाण्यांइतकीच खूपच इंटरेस्टिंग आहे. परंपरा ठाकूर ही उत्तर प्रदेशची. तिचे आई आणि वडील दोघेही गायक. परंपराच्या जन्मागोदरच तिच्या वडिलांनी एक म्युजिक इन्स्टिट्यूट स्थापन केले होते. याच इन्स्टिट्यूट मधून परंपराने संगीताचे धडे गिरवले. त्यामुळे लहानपणापासूनच तिच्यात गायनाची आवड निर्माण झाली होती. The Voice Of India या शोच्या पहिल्या सिजनमध्ये परंपराने सहभाग दर्शवला होता. त्याच सिजनमध्ये साचेत देखील सहभागी झाला होता. साचेतला संगीताची पार्श्वभूमी नसली तरी लहानपणापासूनच तो गाणी गात होता. हे दोन्ही सहभागी झालेले सदस्य या रिऍलिटी शोमध्ये टॉप ४ पर्यंत जाऊन पोहोचले होते. मिका सिंगच्या टीममध्ये परंपरा लोकप्रिय होती तर हिमेशच्या टीममध्ये साचेत लोकप्रिय झाला होता. याच शोमध्ये या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती मात्र शो संपल्यावर ते दोघेही आपापल्या घरी गेले.

काही दिवसांनी मिका सिंगने एक पार्टी आयोजित केली होती त्यात ह्या दोन्ही कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. पार्टीमुळे साचेत आणि परंपरा दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. या भेटीचे पुढे मैत्रीत आणि प्रेमात रूपांतर झाले. या दोघांनी एकत्रित येऊन अनेक गाणी कंपोज केली काही अल्बम साकारले. त्यानंतर त्यांना टॉयलेट एक प्रेम कथा चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. यातील हंस मत पगली… हे गाणं तुफान लोकप्रिय झालं. त्यानंतर अनेक मंचावर बॉलिवूड चित्रपटांची गाणी या दोघांनी एकत्रितपणे सादर केली. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साचेत आणि परंपरा यांनी २७ नोव्हेंबर २०२० रोजी मोठ्या थाटात लग्न केले होते त्यांचे हे लग्न सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले होते. त्यांच्या युट्युब चॅनलवर त्यांनी गायलेल्या गाण्यांना तुफान लोकप्रियता मिळत आहे. त्यांनी गायलेली गाणी अल्पावधीतच हिट देखील ठरत आहेत हे विशेष. त्याचमुळे सध्या हे क्युट कपल आज चर्चेचा विषय ठरत आहे.