शुक्रवारी २ डिसेंबर रोजी अकलूज येथील हॉटेल गलांडे येथे अतुल अवताडे आणि रिंकी मिलिंद पाडगावकर व पिंकी मिलिंद पाडगावकर यांचा विवाह संपन्न झाला. जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केल्याने त्यांचे हे लग्न सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींचं एकमेकींवर अतिशय प्रेम त्या दोघींनी अगोदरच ठरवून ठेवलेलं होतं की आपण एकाच मुलाशी लग्न करून एकाच घरात राहायचं. अर्थात त्यांना हा जोडीदार मिळाला तेही अनपेक्षित पनेच. रिंकी आणि पिंकी या दोघीही आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. तर अतुल अवताडे याचा ट्रॅव्हल्सचा बिजनेस आहे. एकदा या दोघी बहिणी आणि त्यांची आई आजारी पडल्या तेव्हा अतुल त्यांच्या मदतीला धावून आला.

अतुल या सर्वांची काळजी घेत होता ते पाहून दोघींनीही अतुल सोबत लग्नाचा निर्णय घेतला. हे लग्न जेव्हा सोशल मीडियावर चर्चेत आलं त्यावेळी अनेकांनी या लग्नाला विरोधी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीने हे लग्न चुकीचे समजून अकलूज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. कलम ४९४ अंतर्गत अतुल अवताडे, पिंकी आणि रिंकी यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे अकलूज पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सुगावकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या लग्नाविरोधात आता राज्य महिला आयोगाने देखील बोलण्यास सुरुवात केली आहे. महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे जे सध्या खूप चर्चेत आल आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलं आहे की, ‘सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरू आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापूर पोलीस अधीक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरित कायदेशीर कारवाई करावी.

तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा’ अशी मागणी त्यांनी केली आहे. पहिल्या पत्नीच्या हयातीत किंवा ती जिवंत असताना तिच्या परवानगी शिवाय जर दुसरं लग्न झालं असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि सदर व्यक्तीस सात वर्षाच्या शिक्षेसह दंडही भरावा लागतो. यामुळे अतुल अवताडे आणि पिंकी व रिंकी पाडगावकर यांचे लग्न कायद्यात बसत नाही असे आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे आहे. या गुन्ह्यामुळे अतुल सह पिंकी आणि रिंकी तिघेही अडचणीत सापडले असले तरी त्यांचे म्हणणे एवढेच आहे की , आम्ही हे लग्न आमच्या इच्छेनुसारच केलेलं आहे. आमच्या तिघांचीही या लग्नाला मान्यता होती. आम्ही सज्ञान आहोत आणि स्वतःच्या पायावर देखील उभे आहोत असेही या तिघांचे म्हणणे आहे.