
मराठी सृष्टी ओळखली जाते ती अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गजांमुळे. या जोडगोळीने मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला होता. विनोदी अभिनयाने या कलाकारांनी चित्रपटाचा प्रमुख नायक बनून प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर ही पोकळी प्रकर्षाने जाणवली. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यातल्या काही कठीण प्रसंगावर प्रकाश टाकूयात, ज्यामुळे ते आयुष्यात पूर्णपणे खचून गेलेले पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत बेर्डे यांना शिक्षणात फारसा रस नव्हता त्यामुळे आपला मुलगा मॅट्रिकची परीक्षा पास होणार नाही हे त्यांच्या वडिलांना कळून चुकले होते. त्यामुळे एका कंपनीत लक्ष्मीकांत यांना नोकरीला लावले. पण आपले मन नोकरीत रमणार नाही हे लक्ष्मीकांत बेर्डे यांना चांगलेच ठाऊक होते.

कामावर जाताना ट्रेनमधील लोकांचे निरीक्षण करत ते हा प्रवास करू लागले. पण अवघ्या महिन्याभरात ते नोकरीला कंटाळले आणि त्यांनी नोकरीला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. पुढे गिरगावातील साहित्यसंघात पडेल ती कामं त्यांनी केली. पुढे एखाद्या नटाच्या अनुपस्थितीत त्यांना ती भूमिका साकारण्याची संधी मिळायची. शांतेचं कार्ट चालु आहे या नाटकात काम करत असताना अभिनेत्री रुही सोबत त्यांनी आपला संसार थाटला. रुही बेर्डे यांनी त्याअगोदर हिंदी मराठी चित्रपटांची नायिका म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. रुही यशाच्या शिखरावर होती तर लक्ष्मीकांत बेर्डे हळूहळू आपली ओळख बनवू लागले होते. पुढे रुहीच्या येण्यानेच लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नशीब फळफळले होते. दरम्यान टूर टूर या नाटकाने लक्ष्मीकांत बेर्डे यांना चांगली ओळख मिळवून दिली. गजरा मालिका, मराठी, हिंदी चित्रपट असा त्यांचा यशाचा आलेख चढताच राहीला. लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्या आईच्या खूप जवळ होते. आईमुळेच मला विनोदी अभिनयाची जाण झाली असे ते नेहमी म्हणत. आईच्या निधनाने लक्ष्मीकांत बेर्डे खचून गेले त्यानंतर वडीलांचेही निधन झाले. मात्र या दुःखातून रुहीने मला खूप सावरले असे ते एका मुलाखतीत म्हणतात. रुही आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा १५ वर्षांचा संसार सुखासमाधानाने चालत होता मात्र त्यांना मूल नव्हते ही खंत दोघांनाही कायम सतावत राहिली. लक्ष्मीकांत बेर्डे यांना मुलांची फार आवड होती ती कमी त्यांच्या संसारात होती. अशातच ५ एप्रिल १९९८ रोजी रुहीचे निधन झाले. या घटनेमुळे लक्ष्मीकांत बेर्डे खूपच खचले होते.

‘ ती गेली आणि माझं जहाज बुडालं असं मला वाटलं’ अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी रुहीच्या विरहात दिली होती. या घटनेनंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एकटेपणा वाढतच गेला. बरेच दिवस कोणाशीही बोलण्याचे ते टाळत होते, त्यांचे कामातही मन रमत नव्हते. दरम्यान प्रिया अरुण यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना अभिनय आणि स्वानंदी ही दोन अपत्ये झाली. मुलांसोबत वेळ घालवण्याचे त्यांच्या सोबत खेळण्याचे दिवस असतानाच लक्ष्मीकांत बेर्डे यांना किडनीच्या विकाराने ग्रासले. आपल्या अखेरच्या दिवसात ते अंथरुणाला खिळून राहिले होते. याची चर्चा होऊन नये म्हणून झगमगत्या दुनियेपासून दूर राहून ते लोणावळा येथील फार्महाऊसला राहायला गेले. अशातच १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघ्या सृष्टीला धक्का बसला होता.