झी मराठी वाहिनीवर २० मार्च २०२२ म्हणजेच आज रविवार पासून ‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनामिका आणि सौरभ च्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट आहे. मालिकेत कित्येक वर्षानंतर या दोन कॉलेजपासूनच्या मित्र मैत्रिणीची अचानक भेट घडून येते. मालिकेतला अनामीकाचा वावर बिनधास्त आहे तर तिथेच सौरभ मात्र लाजरा, कमी बोलणारा आणि पुरता गोंधळलेला पाहायला मिळाला. शिल्पा तुळसकर हिने अनामीकाची दिलखुलास भूमिका तिच्या अभिनयाने सुंदर वठवली आहे त्यामुळे तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे . तर सौरभच्या भूमिकेत स्वप्नील जोशी परफेक्ट फिट बसला आहे असे म्हणायला हरकत नाही.

तू तेव्हा तशी या मालिकेत बऱ्याचशा नव्या जुन्या कलाकारांची सांगड घातलेली पाहायला मिळत आहे. अभिषेक रहाळकर, सुनील गोडबोले, अभिज्ञा भावे, सुहास जोशी या दमदार कलाकारांची साथ या मालिकेला मिळाली आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या कन्येचे देखील आगमन झाले आहे. नुकतेच झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची एन्ट्री झाली आहे. मोहन जोशी यांनी साकारलेली जगन्नाथ चौधरीची भूमिका आता प्रदीप वेलणकर साकारताना दिसत आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांची लेक देखील झी मराठी वाहिनीवर महत्वाची भूमिका साकारणार आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतील चित्रलेखाची भूमिका ‘मीरा वेलणकर’ हिने साकारली आहे. मीरा वेलणकर हिने जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून शिक्षण घेतले आहे. मीरा ही जाहिरातींचे आणि चित्रपटांचे दिग्दर्शन करते याशिवाय झी मराठीवरील बंधन या गाजलेल्या मालिकेतून तिने अभिनय देखील साकारला होता. मिराची धाकटी बहीण मधुरा वेलणकर साटम ही देखील मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तुमची मुलगी काय करते या मालिकेतून मधुरा मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

तू तेव्हा तशी या मालिकेतून मीरा वेलणकर चित्रलेखाची भूमिका साकारत आहे. बऱ्याच वर्षानंतर मिराचे मालिका सृष्टीत पुनरागमन होत आहे. त्यामुळे तिच्यासाठी ही भूमिका खूप खास आहे. अनामिका तिच्या सासू आणि मुलीसोबत राहते तिथेच ही चित्रलेखा देखील राहत असते. अनामीकाचा नवरा तिला आणि तिच्या लेकीला सोडून गेलेला असतो. तो एक वाया गेलेला मुलगा होता असे अनामीकाची सासू सांगताना पाहायला मिळते. एकंदरीत मालिकेच्या पहिल्याच भागात कथेचा अंदाज बांधला जात आहे त्यामुळे अनामिका आणि सौरभ यांच्या भेटीगाठी देखील वाढणार आहेत. सौरभ तिच्या वहिणीसाठी घेऊन आलेले गिफ्ट अनामीकाच्या गाडीत विसरतो त्यामुळे आता त्यांच्या राहून गेलेल्या प्रेमाची सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे.