झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही पर्वाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. याच अनुषंगाने झी वाहिनी आता रात्रीस खेळ चाले या मालिकेचे ३ पर्व सुरू करत आहे. आजपासून सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केली जात आहे. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शेवंताच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पुरेपूर पसंती दर्शवलेली पाहायला मिळाली त्यामुळे आता तिसऱ्या पर्वात देखील शेवंताचे पात्र सक्रिय राहणार असल्याचे दिसून येते. नुकतेच शेवंताची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने देखील नाईकांच्या वाड्या समोर असलेला तिचा फोटो शेअर करून आजपासून रात्रीस खेळ चाले ३ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे असे म्हटले आहे.

मालिकेत अण्णा नाईक, शेवंता ही पात्र दिसणार असली तरी हे दोन्ही पात्र हयात नाहीयेत त्यामुळे या तिसऱ्या पर्वात प्रेक्षकांना नेमके काय पाहायला भेटणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचप्रमाणे नाईकांच्या कुटुंबातील सदस्य या मालिकेतून दिसणार का? किंवा यापुढील कथानक नेमके कसे असणार? याचीही उत्सुकता पाहायला मिळते आहे. मालिकेच्या प्रोमोत देखील मालिकेने आपले कथानक उलगडले नाही, हे कथानक गुलदस्त्यात ठेवले असल्याने नेमके पुढे काय काय पहायला मिळणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल परंतु तुर्तास प्रेक्षकांनी या मालिकेच्या वेळेबद्दल थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे. ही मालिका किमान १०.३० वाजता प्रक्षेपित व्हावी अशी आशा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे. “देवमाणूस” ही झी मराठीची मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असे कथानकावरून वाटत होते परंतु मालिकेच्या कालच्याच भागात या कथानकाला एक मोठे वळण लागल्याचे दिसून आले त्यामुळे तुर्तास तरी देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.देवमाणूस मालिकेला मिळालेली प्रेक्षकांची पसंती पाहता रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका आता ११ वाजता प्रक्षेपित केली जात आहे परंतु असे असले तरी मालिकेचा चाहता वर्ग ही मालिका तितक्याच आपुलकीने पाहिल यात शंका नाही.