३५ वर्षांपूर्वी रविंद्र महाजनी यांनी पुण्यात सुंदर घर बांधलं .. ३ ऱ्या मजल्यावर स्विमिंगपुल पाहून लोकं ते घर बघायला यायचे पण पुढे
रविंद्र महाजनी यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने चांगलाच गाजवला होता. दिसायला अतिशय देखण्या असलेल्या रविंद्र महाजनी यांना पहिल्यांदा सुधीर फडके यांनी हेरले होते. रवींद्र महाजनी आणि माधवीच्या लग्नात ते हजर होते तेव्हा माधवीच्या आईला त्यांनी ‘तुमचा जावई हिरोसारखा दिसतो’ अशी दाद दिली होती. सुधीर फडके यांच्याच पुढाकाराने रविंद्र महाजनी यांना अभिनय क्षेत्रात यायचा मार्ग सापडला होता. रंजना या उत्तम डान्सर खरं तर रविंद्र महाजनी यांना डान्स अजिबातच येत नसे पण आघाडीचा नायक असल्याने त्यांनी दिग्दर्शकाला सांगून ‘हा सागरी किनारा…’ या गाण्यात त्यांना हवं तसं काम करून घेतलं होतं. अभिनय क्षेत्रात त्यांचं नशीब एका ताऱ्यासारखं चमकलं त्याच जोडीला त्यांनी बांधकाम व्यवसायात देखील पाऊल टाकलं होतं.
मुंबईत ते भाड्याच्या घरात राहिले होते. माधवी यांच्या आई एलआयसीमध्ये उच्च पदावर कार्यरत असताना त्यांनी कोथरूडमध्ये सहा गुंठे जागा घेऊन ठेवली होती. ती जागा त्यांनी माधवीला देऊन टाकली होती. तेव्हा रविंद्र महाजनी यांनी त्या जागेवर तीन मजल्याचं मोठं घर बांधून घेतलं होतं. या घराच्या तळमजल्यावर सात दुकानं आणि तिसऱ्या मजल्यावर त्यांनी स्विमिंगपुल बनवलं होतं. ते घर इतकं सुरेख बांधलं गेलं की रस्त्याने जाता येत लोक थोडं थांबून ते घर बघत असत. ३५ वर्षांपूर्वी कोथरूडच्या एलआयसी कॉलनीत फारशी सुधारणा झालेली नव्हती. तेव्हा तिसऱ्या मजल्यावर स्विमिंगपुल बांधल्याचे पाहून अनेकांना त्याचं मोठं आश्चर्य वाटायचं. माधवी महाजनी या घराची आठवण सांगताना म्हणतात की, ‘ते घर बांधत असताना एक लिफ्ट असायला हवी होती असं सुचवण्यात आलं. रवींद्र आणि मी घराची पूजा (वास्तू शांती) देखील केली आम्ही सगळे तिथे राहायचो. त्यावेळी रश्मी आठवीत शिकत होती.
तेव्हा रवीला जिना वर चढून जायचा त्रास जाणवू लागला होता. त्यावेळी त्या घराला लिफ्ट असायला हवी होती असे त्याला वाटू लागले. कालांतराने आरोग्याच्या कारणास्तव तो तिथे यायचा बंद झाला.’ रविंद्र महाजनी यांनी बांधलेल्या याच घराच्या पहिल्या मजल्यावर गश्मीरने GRM (गश्मीर रविंद्र महाजनी) या नावाने त्याचा डान्स स्टुडिओ सुरू केला. गश्मीर कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असतो. पण आजही माधवी महाजनी या घरातच वास्तव्यास आहेत. आधार आणि एक सोबत म्हणून त्यांनी तिथे काही मुलींना पेइंगगेस्ट म्हणून राहण्याची सुविधा करून दिली आहे.