हे दोघे ठरले ५० मिलियन व्युव्ज मिळवलेले ‘पहिलेच’ मराठी कलाकार… इंस्टाग्रामनेही त्यांच्या या क्रिएटीव्हिटीची घेतली दखल
आजचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडिया स्टार्स रिल्स, व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात, सध्याच्या घडीला मनोरंजनाचे हे एक मोठे माध्यम बनले आहे. त्यामुळे कितीतरी कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हा एक तगडा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. टिकटॉकमधून प्रसिद्धी मिळणारा सूरज चव्हाण याच माध्यमामुळे आज टीव्ही, चित्रपटात पाहायला मिळत आहे. मराठी सृष्टीतही अशाच सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांना अभिनयाची संधी मिळत असते. एक रिल्स बनवून रातोरात प्रसिद्धी मिळणारे कलाकारही इथे कमी नाहीत.
त्यामुळे मराठी कलाकारही आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या माध्यमाचा आधार घेत आहेत. गेल्या काही दिवसांत जे कलाकार कधी कुठे दिसत नव्हते ते कलाकार रिल्स, व्हिडीओ बनवून लोकांची पसंती मिळवू लागले आहेत. अशातच अभिनेता संकेत कोर्लेकर आणि अभिनेत्री रश्मी अनपट यांनी मालिकेत एकत्रित काम करत असताना सहज म्हणून रिल बनवण्याचे ठरवले. बघता बघता त्यांच्या या व्हडिओला लाखोंचे व्युव्ह्ज मिळाले. तेव्हापासून संकेत आणि रश्मी एकत्रित कंटेंट क्रिएट करून लोकांपर्यंत पोहोचू लागले. लोकांना त्यांचे हे व्हिडीओ आवडू लागले. या जोडीने इन्स्टाग्रामवर अवघ्या काही दिवसातच ५० मिलियन्स व्युव्ज मिळवून एक रेकॉर्डच केला आहे.
मालिका विश्वातील आर्टिस्ट म्हणून ५० मिलियन व्युव्ह्ज मिळणारे हे पहिलेच सेलिब्रिटी आहेत. इंस्टाग्रामनेही त्यांच्या या क्रिएटीव्हिटीची दखल घेतली आहे. संकेत कोर्लेकर हा नाटक, एकांकिकेतून मालिका सृष्टीत दाखल झाला होता. अंतरपाट, अजूनही बरसात आहे अशा मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. संकेतची बहीण उमा कोर्लेकर ही देखील आर्टिस्ट आहे. या दोघा बहीण भावांचे एकत्रित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले आहेत.