मराठी टेलिव्हिजन वरील एकेकाळची सर्वात लोकप्रिय जोडी “राणा आणि अंजली” ह्यांचं खऱ्या आयुष्यात देखील आज लग्न झालं आहे. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी यापूर्वी देखील सोबत काम करणाऱ्या कलाकारासोबत आयुष्याची रेशीमगाठ बांधली आहे. आज १ नाही तर २ मराठी कलाकारांच्या जोड्या एकाच दिवशी लग्न बंधनात अडकताना पाहायला मिळाले. अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले याच्या सोबतच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज विवाह बंधनात अडकले. अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर यांच्या लग्नाचे फोटो पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या मराठमोळया जोडीच्या लग्नाची चर्चा सुरू होती ते लग्नं म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचं लग्नं. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या या जोडीच्या डोक्यावर जवळचे नातेवाईक आणि मोजक्या मित्रपरिवाराच्या साक्षीने अक्षता पडल्या.

गेल्या पाच दिवसांपासून अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाचे विधी सुरू होते. पुण्यातील एका हॉटेलच्या आलिशान हॉलमध्ये अक्षया आण हार्दिक यांचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी अक्षयाने नऊवारी साडी तर हार्दिकने सलवार कुर्ता घातला होता. लग्नातील दोघांचाही पारंपरिक लुक सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पारंपरिक पेहरावात नवरदेव आणि नवरी मुलगी अगदी सुंदर दिसत होते. त्यांच्यावरून तर उपस्थितांच्या नजरा हटत नव्हत्या. या दोघांची खास गोष्ट म्हणजे लग्न विधींपासून ते लग्नापर्यंत साऱ्या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळेच चाहत्यांनाही त्यांच्या आनंदात सहभागी होता आलं. हार्दिक आणि अक्षयाने एकत्र जी पहिली मालिका केली त्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कलाकार तसेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील कलाकार खास या लग्नासाठी आले होते. त्यांच्यासोबत हार्दिक आणि अक्षया धमाल करताना दिसले. भर मांडवात हार्दिकने अक्षयाच्या गालावर किस केल्याचा फोटो व्हायरल होत आहे. अक्षय आणि हार्दिक होमविधीसाठी बसले असताना हार्दिकने अक्षयाच्या नावाचा उखाणा घेऊन तिला किस केलं. यावेळी अक्षया दिलखुलासपणे हसताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा होती. त्या दोघांचं लग्न कधी,कुठं होणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना होती. दोघांच्याही मित्रमंडळींनी आणि परिवारानं दोघांची केळवणं केली. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतकंच नाही तर त्या दोघांच्या लग्नपत्रिकेचा फोटोही व्हायरल झाला होता.

परंतु हे दोघं नेमके कोणत्या तारखेला लग्न करणार हे मात्र काही दिवस त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं होतं. गेल्या आठवड्यात अक्षयाने खास लग्नासाठी नेलआर्ट केलं. यावेळी २ डिसेंबर ही लग्नाची तारीख अक्षयाने तिच्या नखांवर कोरली. हा ट्रेंडही सोशलमीडियावर व्हायरल झाला. हार्दिकने सोनेरी रंगाचा अंगरखा परिधान केला आहे. त्यावर अक्षयाच्या साडीसोबत जुळणारी शाल घेतली आहे. गळ्यात भलीमोठी रुद्राक्षांची माळ घातली असून दोघांच्याही डोक्यावर मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. अगदी पेशवाई थाटात ते दोघेही यज्ञासमोर बसले आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, अक्षया आणि हार्दिकने ३ मे रोजी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आता अक्षया आणि हार्दिक लग्न बंधनात अडकले.