कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेतील अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मालिकेत अपर्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता निक्रड हिचे नुकतेच केळवण साजरे करण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंकिता निक्रड आणि ज्ञानेश भुकेले यांच्या लग्नाची सुपारी फुटली होती. ज्ञानेश भुकेले आणि अंकिता एकमेकांना खूप आधीपासूनच ओळखतात. या मैत्रीचे रूपांतर आता नात्याच्या बंधनात होणार आहे. ज्ञानेश भुकेले हा मूळचा कोल्हापूरचा परंतु त्याचे कुटुंब पुण्यात वास्तव्यास आहे.

ज्ञानेश हा लेखक, पत्रकार आणि व्यख्याता म्हणून ओळखला जातो. ज्ञान मीडिया या संस्थेचा तो संस्थापक देखील आहे. लवकरच या दोघांचे थाटात लग्न पार पडणार आहे. अंकिता निक्रड हिचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले ते ओघानेच कारण लहानपणी कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी न झालेली अंकिता आज मालिका सृष्टीत दमदार भूमिका निभावताना दिसत आहे. अंकिताने दहावी नंतर ३ वर्षे डिप्लोमा इंजिनिअरिंगचा अभ्यास केला होता. शेवटच्या वर्षात शिकत असताना अंकिताने पहिल्यांदा नाटकातून काम केले. त्यामुळे बाकीच्या क्षेत्रापेक्षा अभिनय क्षेत्राची ओढ तिला जाणवू लागली. इंजिनिअरिंगमध्ये मन रमत नसल्याने तिने शिक्षण अर्धवट सोडलं आणि अभिनयाच्या ओढीने पुण्यातील ललित कला केंद्र मध्ये प्रवेश मिळवला. इथूनच तिचा रंगभूमीवरचा खरा प्रवास सुरु झाला. तीन वर्षे नाट्यशास्त्र विषयाचे प्रशिक्षण घेतले त्यानंतर मुंबईच्या लोककला विभागात ऍडमिशन घेतले. अभिनयाचे बारकावे शिकत असताना शॉर्टफिल्म आणि नाटकातून काम करण्याची संधी मिळत गेली. यासोबतच वृद्धाश्रम, अनाथालयातील मुलांसाठी शो केले.

मधल्या काळात नाटकांचे प्रयोग थांबले त्यानंतर कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या लोकप्रिय मालिकेत अपर्णाचे आव्हानात्मक पात्र मिळाले. अपर्णाचे विरोधी पात्र अंकिताने तिच्या सहजसुंदर अभिनयाने सुरेख वठवलेले पाहायला मिळाले. सुरुवातीला या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप विरोध केलेला पाहायला मिळाला होता. मात्र ही आपल्या अभिनयाची पावती आहे असा विश्वास अंकिताला वाटू लागला. सन मराठी या वाहिनीवरील सुंदरी या आणखी एका मालिकेत अंकिता महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेतून अंकिताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे तिला या क्षेत्रात एक वेगळी ओळख मिळाली आहे. येत्या काही दिवसातच अंकिता विवाहबंधनात अडकणार असल्याने तिच्या घरी लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे.