सध्या मराठी सृष्टीत सगळीकडे सेलिब्रिटींच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळते आहे. विजय आंदळकर, अभिनेत्री सई कल्याणकर, श्वेता अंबिकर हे कलाकार नुकतेच विवाहबद्ध झाले आहेत तर गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांच्या घरी देखील लग्नाची लगबग सुरू झाली आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील राजा राणीची गं जोडी या गाजलेल्या मालिकेतील दादासाहेब ढाणेपाटील हे देखील नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. मालिकेत दादासाहेबांची भूमिका विरोधी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना नेहमीच प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

दादासाहेबांची भूमिका अभिनेते शैलेश कोरडे यांनी साकारली आहे. शैलेश कोरडे यांनी अगदी मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रित करून अभिनेत्री श्रुती कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधली आहे. सद्य परिस्थितीमुळे मोजक्याच नातेवाईक आणि मित्र मंडळींना त्यांनी लग्नाला आमंत्रित केले होते. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असोत अशी आशा त्यांनी व्यक्त करत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. शैलेश कोरडे आणि श्रुती कुलकर्णी हे एकमेकांना गेल्या आठ वर्षांपासून ओळखत होते. या ओळखीचे प्रेमात आणि आता लग्नात रूपांतर झाले आहे. शैलेश कोरडे यांनी राजा राणीची गं जोडी या मालिकेअगोदर झी मराठीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेतून काम केले होते. मालिकेतील मुख्य नायक मदनचा भाऊ पोपटची भूमिका शैलेश कोरडे यांनी साकारली होती. आपल्याच धुंदीत असलेला हा पोपट शैलेश कोरडे यांनी सुरेख निभावला होता. ही त्यांनी अभिनित केलेली पहिली टीव्ही मालिका ठरली. शैलेश कोरडे हे मूळचे औरंगाबादचे.

मालिकेत येण्याअगोदर व्यावसायिक नाटकातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. एक ठराविक भूमिकेत अडकून न राहता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची त्यांना संधी मिळत गेली. अभिनयासोबतच त्यांनी लेखक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. राजा राणीची गं जोडी मालिकेतील दादासाहेबांच्या भूमिकेमुळे शैलेश कोरडे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. त्यामुळे ही भूमिका त्यांच्या करिअरच्या बाबतीत अधोरेखित करणारी ठरली आहे. शैलेश कोरडे यांची पत्नी श्रुती कुलकर्णी या नाट्य तसेच मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. फक्त मराठीवरील ‘स्पेशल पोलीस फोर्स’ या मालिकेत तसेच समुद्र, शंभूराजे या नाटकातून त्यांनी काम केलं आहे. मिसिंग द अनटोल्ड या शॉर्टफिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन श्रुती कुलकर्णी यांनी केले आहे. श्रुतीला अभिनय , दिग्दर्शन, लेखन, नृत्य तसेच गायन या कला अवगत आहेत. या दोन्ही कलाकार दाम्पत्यास विवाहाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…