
सोनी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका सुरू होणार आहे . या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांनी या मालिकेबाबत उत्सुकता दाखवली आहे. तुझ्यात जीव रंगला ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका बहुतेकांना आठवत असेल. या मालिकेत पाठक बाई आणि राणादाच्या जोडी इतकीच नंदिता आणि सुरजची जोडी हिट झाली होती. मालिकेत सन्नीदा म्हणून ओळखला जाणारा हा सूरज ‘…नाहीतर गोळीच घालीन’ या डायलॉगमुळेदेखील प्रसिद्धीच्या झोतात आला होता. ही भूमिका राज हंचनाळे या कलाकाराने साकारली होती. या मालिकेनंतर चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्नमध्ये तो झळकला.

दुष्यंतप्रिय ना नाटकातून राज मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. आता राज हंचनाळे त्याच्या आगामी मालिकेतून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या नव्या मालिकेचे नाव जाहीर करण्यात आले नसले तरी दाक्षिणात्य नायिका आणि मराठमोळा नायक यांची अफलातून प्रेमकहाणी या मालिकेतून रंगलेली पाहायला मिळणार आहे. राज हंचनाळे सोबत प्रतीक्षा शिवणकर या मालिकेत नायिकेची भूमिका बजावणार आहे. प्रतीक्षा शिवणकर हिने या मालिकेच्या प्रोमोमधून दाक्षिणात्य नायिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. त्यामुळे तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. प्रतीक्षा ही मूळची गडचिरोलीची. मात्र ती मुंबईतच वास्तव्यास आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रतीक्षाने डॉ अभिषेक साळुंके सोबत लग्नाची गाठ बांधली. अभिषेक साळुंके रेडीओलॉजिस्ट आहे. नृत्याची विशेष आवड असलेल्या प्रतीक्षाने कॉलेजमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग दर्शवला होता. अभिनयाची आवड असल्याने प्रशांत दामले यांच्या टी स्कुलमधून प्रतिक्षाने परफॉर्मन्स डेव्हलपमेंट कोर्स इन थिएटर आर्टस् चे प्रशिक्षण घेतले.

इथेच तिला प्रशांत दामले यांच्याच एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकातून अभिनयाची नामी संधी मिळाली. कॉलेज डायरी या चित्रपटात प्रतीक्षा महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. स्टार प्रवाहवरील कॉमेडी बिमेडी या शोमध्ये तिने अनेक विनोदी स्कीट्स सादर केले. आता प्रथमच प्रतीक्षाला आगामी मालिकेतून मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकण्याची संधी मिळाली आहे. दाक्षिणात्य नायिकेची झलक या नव्या मालिकेच्या प्रोमोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सोनी मराठीवरील ही मालिका प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकून घेणार असा विश्वास आहे. या आगामी मालिकेचे नाव लवकरच जाहीर केले जाईल तूर्तास राज हंचनाळे आणि प्रतीक्षा शिवणकर यांना नव्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा!.