अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदना यांची प्रमुख भूमिका असलेला पुष्पा द राईज हा सिनेमा थेटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातली श्रीवल्ली, सामी सामी , हे बिड्डा ये मेरा अड्डा …ही गाणी देखील सुपरडुपर हिट झाली आहेत. श्रीवल्ली या गाण्याचे अमरावतीच्या पठ्ठ्याने नुकतेच मराठी व्हर्जन बनवले आहे. मराठी व्हर्जनमधील श्रीवल्ली गाण्याला युट्युब चॅनलवर आतापर्यंत ९ लाखांहून अधिक व्हिवज मिळाले आहेत. श्रीनिवास स्टुडिओ अमरावती आणि आदित्य म्युजिक यांच्या साथीनं हे गाणं गायलं आहे विनोदी कलाकार ” विजय खंडारे” याने. या गाण्याचे गीतकार देखील विजय खंडारे आहे.

या गाण्यात विजय खंडारे सह तृप्ती खंडारे मुख्य भूमिकेत दिसत आहेत त्या दोघांना राधिका नागरमोटे, रोशन चौधरी, मनीष पटांगरे, सुहासिनी गुल्हाने यांची साथ मिळाली आहे. सोशल मीडियावर श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनला तुफान प्रसिद्धी मिळत आहे. विजय खंडारे हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातला आहे. सध्या तो कामानिमित्त अमरावती शहरात वास्तव्यास आहे. आर जी देशमुख सायन्स कॉलेज आणि त्यानंतर संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी अमरावती येथून त्याने पदवीचे शिक्षण घेतले आहे. अभिनयाची आवड असलेल्या विजयने स्वतःचे युट्युब चॅनल सुरू केले आहे. वऱ्हाडी भाषेचा बाज असलेले अनेक गमतीशीर व्हिडीओ त्याने अपलोड केले आहेत. तृप्ती खंडारे आणि विजयचे एकत्रित असलेले मजेशीर व्हिडीओज अनेकांना आवडले आहेत. त्याच्या या व्हिडीओजना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या युट्युब चॅनलला आतापर्यंत १ लाख ७५ हजाराहून अधिक जणांनी सबस्क्राईब केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली ह्या गाण्याचे मराठी व्हर्जन प्रेक्षकांसमोर आणले.
अवघ्या १३ दिवसातच त्याने गायलेल्या ह्या गाण्याला खूप चांगली लोकप्रियता मिळवली आहे. या गाण्यामुळे विजय खंडारे रातोरात स्टार बनला असल्याचे दिसून येते. हे गाणं आवडलं असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली असून मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडत आहे. अर्थात ह्या सर्व गोष्टी कॉपीराईट असल्या तरी विजयने हे गाणं केवळ आणि केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार केलं आहे. एका गाण्यामुळे रातोरात स्टार झालेला विजय पुढे जाऊन मराठी सृष्टीतही झळकावा अशी अपेक्षा आहे. एक विनोदी कलाकार म्हणून त्याला मराठी सृष्टीत वाव मिळेलही कारण यागोदरही भारत गणेशपुरे, योगेश शिरसाट अशा कलाकारांनी ग्रामीण भाषेच्या शैलीतून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विजय खंडारे या उदयोन्मुख कलाकाराला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा….