आज अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ ची प्रतीक्षा संपली आणि थिएटरमध्ये प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली. पहिल्याच दिवशी पुष्पा २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. शाहरुख खानचा जवान आणि एनिमल चित्रपटाचा रेकॉर्डही त्याने मोडीत काढला आहे. आज सकाळपासूनच हा चित्रपट लिक झाल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनवर परिणाम होईल असे बोलले जात होते. पण तरीही थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आज पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची गर्दी पाहता शोमध्ये वाढ करण्यात आली होती.
पुणे, मुंबई, ठाण्यासह अहमदाबाद, दिल्ली, कलकत्ता या ठिकाणीही रात्री ११.५५ वाजताचे मिडनाईट शो लावण्यात येणार आहेत. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ११४.४ करोडचा गल्ला जमवला आहे. रात्रीचे शो वाढवल्याने या कमाईच्या आकड्यात अधिक वाढ होणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवसात पुष्पा २ १५० कोटींचा टप्पा पार करू शकतो असे बोलले जात आहे. शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६५.५० कोटींचा गल्ला जमवला होता. तर रणबीर कपूरच्या एनिमल चित्रपटाने ५४.७५ कोटींचा गल्ला जमवलेला होता. तुलनेने पुष्पा २ चित्रपट दोन्ही बॉलिवूड चित्रपटाच्या कमाई मध्ये वरचढ ठरला आहे. पुष्पा २ हा चित्रपट प्रदर्शनाअगोदर वादग्रस्त ठरला होता.
आक्षेपार्ह दृश्यांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचे बोलले जात होते, पण ही सर्व अडथळे पार करत पुष्पा २ ने आज बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सारासार विचार करता चित्रपट समीक्षकांकडून ४.५ चे रेटिंग देण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच हा चित्रपट प्रेक्षकांनी पहावा असे म्हटले गेले आहे. दरम्यान kgf २ चित्रपटाने पहिल्याच दिवशी १३४ कोटींचा टप्पा पार केला होता. पुष्पा २ चित्रपटाचा हा रेकॉर्डही मोडीत काढणार असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.