एका लग्नाच्या अनेक गोष्टी अस झालंय असे म्हणत प्रशांत दामले यांनी मुली नातवंडासोबत एन्जॉय केली ट्रिप

प्रशांत दामले म्हणजे मराठी सृष्टीतील हास्याचा एक खळखळत्या उत्साहाचा झरा असे म्हटले जाते. साखर खाल्लेला माणूस, मोरूची मावशी, एका लग्नाची गोष्ट, बहुरुपी अशी त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या बहुतेक नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने १००० हून अधिक यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. केवळ अभिनय क्षेत्रात काम न करता त्यांनी अनेक नवख्या कलाकारांना प्रशिक्षण देऊन घडवण्याचे काम हाती घेतले आहे. यातून त्यांनी बहुतेकांना नाटकातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रशांत दामले यांचा अभिनयाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला तो काळ होता १९७८ चा.

अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना प्रशांत दामले यांना सुधीर भट यांची मोलाची मदत मिळाली. त्याअगोदर हौशी नाटक करता करता त्यांना १९८३ सालीच्या टूर टूर नाटकातून काम करण्याची नामी संधी मिळाली होती. त्याच वेळी बेस्टमध्ये त्यांना नोकरी लागली. मग पुढे महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, बहुरुपी, चित्रपट सुरू झाले या प्रवासात त्यांना बेस्टकडून खूप चांगले सहकार्य मिळाले. एवढेच नाही तर त्यांनी प्रशांत दामले यांना जवळजवळ ५ वर्षांची सुट्टीच मंजूर करून दिली. मात्र एकीकडे नाटकांची आवड आणि घरसंसार या द्विधामनस्थितीत असताना कोणतातरी एक निर्णय घ्यावा लागेल याची जाणीव त्यांना झाली. १९९२ मध्ये गेला माधव कुणीकडे या नाटकाच्या पहिल्याच प्रयोग वेळी जाणवलं की आता आपण हेच काम करायचंय. पदरी दोन मुली असल्याने पत्नीशी विचारविनिमय केला आणि १०० टक्के नाटकच करायचं असा निर्णय मनाशी पक्का केला. २०१२ मध्ये त्यांनी पुण्यामध्ये ‘थिएटर स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ ही संस्था चालू केली होती. तरुण आणि होतकरू मुलांना अभिनयाचे धडे या संस्थेमार्फत दिले जातात. त्याचप्रमाणे व्यावसायिक डान्सचे ट्रेनिंगदेखील या इन्स्टिट्यूटमध्ये दिले जाते.

प्रशांत दामले यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल नेहमी भरभरून बोललं जातं मात्र त्यांच्या कुटुंबियाबद्दल फारशी माहिती पाहायला मिळत नाही. प्रशांत दामले यांची पत्नी गौरी दामले त्यांना कंकना आणि चंदना ह्या दोन मुली आहेत. चंदनाचे निहार जोशी सोबत लग्न झाले . प्रशांत दामले यांचा जावई निहारने मास मीडियाचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते सिंगापूरला स्थायिक आहेत. रोहन आणि अनायरा ही दोन नातवंड प्रशांत दामले यांना आहेत. तर त्यांची धाकटी मुलगी कंकना हिने लेरॉय डिसूझा सोबत थाटात लग्न केले आहे. कोरोनाच्या काळात मागील ३ वर्षांपासून प्रशांत दामले आपल्या लेकींना आणि नातवंडांना भेटले नव्हते. मात्र ‘एका लग्नाच्या अनेक गोष्टी अस झालंय आता’ असे म्हणत त्यांनी कुटुंबियांसोबत एक छानशी ट्रिप एन्जॉय केली आहे.