आजवर पुण्याच्या गल्लोगल्लीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहेत. खराटा घेऊन गल्ल्या झाडून काढणाऱ्या महिला असो वा दारोदारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी फिरणारी गाडी . या सर्व सोयीमुळे आसपासचा परिसर स्वच्छ राखण्यास मदत होत आहे. त्यात आता आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न म्हणून पुण्यात एक अनोखा संकल्प राबवला जात आहे. नागरिकांना या संकल्पनेतून योग्य तो मोबदला देखील मिळणार आहे हे विशेष. ही संकल्पना आहे “स्वच्छ ATM” ची. स्वच्छ ATM या अभियानाअंतर्गत नागरिकांना त्यांच्या जवळील प्लास्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक रॅपर्स आणि धातूच्या कॅनची विल्हेवाट लावता यावी या हेतूने स्वच्छ एटीएम मशीन बसवण्यात आले आहेत.

हा सदर कचरा इतरत्र तसाच पडून असल्याने कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. त्यातून भंगारवाला देखील ह्या गोष्टींचा पुरेसा मोबदला कधी देत नाहीत शिवाय प्लास्टिकच्या बाटल्या देखील ते कधी कधी स्वीकारत नाहीत मग त्या इतरत्र टाकून त्याची घरातून हकालपट्टी होते मात्र जिथे टाकली तिथला परिसर अस्वच्छ राहतो या सर्व गोष्टी विचारात घेऊन स्वच्छ एटीएमचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. ह्या एटीएम मशीनमध्ये तुम्ही वरील वस्तू टाकल्यास त्याचा मोबदला देखील मिळणार आहे. या चारही वस्तूंसाठी एक विशिष्ट दर लावण्यात आला आहे. त्याप्रमाणे हे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात मिळणार आहेत. प्लास्टिकच्या एका बाटलीसाठी १ रुपया, काचेच्या एका बाटलीसाठी ३ रुपये, धातूच्या एका कॅन साठी २ रुपये आणि प्लास्टिकच्या एका रॅपरसाठी ०.२० रुपये एवढा दर नागरिकांना या एटीएम मधून त्यांच्या खात्यात मिळणार आहे. हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागणार आहे.

त्यानंतर प्लॅस्टिकची बाटली, धातूचा कॅन, प्लास्टिकचे रॅपर आणि काचेची बाटली यामधून कचऱ्याचा योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. हा कचरा एटीएम मशीनमध्ये टाकल्यानंतर वर सांगितल्या प्रमाणे पैसे नागरिकांच्या खात्यात जमा केले जातील. ही बाब सोयीस्कर असल्याने नागरिक या एटीएमचा वापर निश्चित करतील अशी आशा आहे. हे अभियान यशस्वी ठरल्यास सर्वत्र अभियान राबवणे शक्य होईल. त्यामुळे नागरिकांना देखील सदर कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न भेडसावणार नाही. पुण्यात तब्बल ४० ठिकाणी हे एटीएम मशीन बसवले जात आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा हे व्हिडीओ द्वारे सांगितले जाईल असे कमिटी चेअरमन हेमंत रसाने यांनी स्पष्ट केले आहे. ह्या स्वच्छ एटीएम अंतर्गत इतर सुविधा देखील पुरवण्यात येणार आहेत जसे की, २४ तास मोफत वायफाय, बस, सिनेमा, ट्रेन यांची तिकिटं आणि नवीन बँकेचे खाते उघडणे, नवीन सिमकार्ड खरेदी करणे या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे पूणेकरांनी या स्वच्छ एटीएम अभियानाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केलेले पाहायला मिळत आहे.