पिंजरा हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक अजरामर चित्रपट ठरला आहे. पन्नास वर्षांपूर्वी म्हणजेच ३१ मार्च १९७२ रोजी पिंजरा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यामुळे तो सुवर्णमोहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना दिसत आहे. व्ही शांताराम यांचे दिगदर्शन, जगदीश खेबुडकर यांची गाणी आणि राम कदम यांचे संगीत या तिहेरी संगमाने पिंजरा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये अक्षरशः न्हाऊन निघालेला पाहायला मिळाला. आजही या चित्रपटाचे कथानक रसिकप्रेक्षकांच्या स्मरणात असून त्यातील अजरामर गाणी तेवढीच ओठावर आहेत. आजकाल चित्रपट प्रदर्शित होण्यागोदरच तो चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आखल्या जातात. चित्रपटातील नायक नायिकेची नावं गुलदस्त्यात ठेवणं असो किंवा ठिकठिकाणी केलेली हटके पोस्टरबाजी असो या गोष्टी प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत.

व्ही शांताराम यांनी त्याकाळी देखील पिंजरा चित्रपटाचे प्रमोशन हटके अंदाजात केलेले पाहायला मिळाले होते. वेळेची कमतरता आणि अपुरा पैसा ह्यामुळे चित्रपटाच्या जाहिराती करणे देखील कठीण होत होते. अश्यातच नवी युक्ती सुचली आणि इतिहास घडला. पुण्यातील रिक्षांवर कुठलाही फोटो प्रसिद्ध न करता केवळ ‘पिंजरा’ लिहूनच प्रमोशन केले होते. त्यामुळे हा पिंजरा नक्की आहे तरी काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला होता. अखेर ३१ मार्च १९७२ चा तो दिवस उजाडला आणि प्रेक्षकांनी पिंजरा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहाबाहेर तुडुंब गर्दी केलेली पाहायला मिळाली. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. लता दीदी, उषा मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गं साजणे, मला लागली कुणाची उचकी, दिसला गं बाई दिसला, छबिदार छबी, आली आली सुगी, बाई मला ईस्काची इंगळी, कशी नशिबानं थट्टा आज अशी अनेक गाजलेली गीतं या चित्रपटाने दिली आहेत. त्यावेळी हा चित्रपट बनवण्यासाठी २० लाख रुपये एवढा खर्च आला होता. मात्र चित्रपटाला मिळालेला तुफान प्रतिसाद हा प्रत्येक कलाकारावर पैशांचा पाऊस पाडणारा ठरला. केवळ चित्रपटाचे कलाकारच नाहीत तर या चित्रपटाची तिकिटं ब्लॅकने विकणाऱ्या लोकांनाही या चित्रपटाने श्रीमंत केले होते.

व्ही शांताराम यांनी या चित्रपटासाठी पत्नी संध्याला मुख्य नायिकेची संधी दिली होती. संध्या यांच्या थोरल्या भगिनी वत्सला देशमुख या चित्रपटात आक्काची भूमिका साकारताना दिसल्या. तर श्रीराम लागू यांचा पदार्पणातील हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला होता. निळू फुले, भालचंद्र कुलकर्णी, काका चिटणीस, कृष्णकांत दळवी या कलाकारांची साथ त्यांना मिळाली होती. विशेष म्हणजे ज्यांना बॅक आर्टिस्ट म्हणून संध्याजींसोबत नृत्यात झळकण्याची संधी मिळाली त्या उषा नाईक, माया जाधव कालांतराने प्रसिद्धीस येऊन मुख्य भूमिका निभावू लागल्या. पुण्यात तब्बल १३४ आठवडे हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये ठाण मांडून होता. १९७३ साली या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. येत्या ३१ मार्च रोजी पिंजरा चित्रपट प्रदर्शित होऊन ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्याचा हा सुवर्ण अनुभव प्रेक्षक मात्र कदापि विसरणार नाहीत.