स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला आजवर प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. मालिकेतील शुभम आणि कीर्तीच्या भूमिकेईतकीच जिजी आक्कांची भूमिका देखील प्रचंड गाजली. ही भूमिका अदिती मूलगुंड देशपांडे यांनी निभावली आहे. अदिती देशपांडे या हिंदी मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री आहेत ‘ पेहरेदार पिया की’ या हिंदी मालिकेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. नॉट ओन्ली मिसेस राऊत, जोगवा, दशक्रिया ह्या त्यांनी अभिनित केलेल्या चित्रपटांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अदिती देशपांडे या दिवंगत अभिनेत्री “सुलभा देशपांडे” यांच्या सून आहेत.

सुलभाताई देशपांडे ह्या पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर. छबिलदास शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली होती. आज सुलभा देशपांडे आपल्यात नसल्या तरी ११५ मराठी आणि २११ हुन अधिक हिंदी मालिका गाजवून त्या आपल्या कायम स्मरणात राहिल्या आहेत. सुलभा देशपांडे आणि अरविंद देशपांडे यांचा मुलगा निनाद देशपांडे हे देखील बालपणापासूनच अभिनय सृष्टीत कार्यरत आहेत. आई कुठे काय करते या मालिकेत निनाद देशपांडे यांनी अनघाच्या वडिलांची म्हणजेच प्रदीप दादांची भूमिका साकारली आहे. आपले आई वडील मराठी सृष्टीतील मोठं नाव असूनही त्यांच्या नावाचा वापर करायचा नाही अशी सक्त ताकीदच त्यांना मिळाली होती. “तुला स्वत:ची ओळख स्वत:च बनवायची आहे. लागेल ती मदत आम्ही करू. पण तुला रोल द्या, असे कोणालाही सांगणार नाही. आम्ही दोघांनीही कोणाकडे काम मागितले नाही. स्वत:ला सिद्ध केले आणि लोक आमच्याकडे आले. तुझ्याकडून आमची तीच अपेक्षा आहे”. अशी तंबीच त्यावेळी त्यांच्याकडून मिळाली होती.

त्यामुळे नाटकात चित्रपटात काम करत असताना मी कोणी खास आहे अशी डोक्यात हवा गेली नाही असे निनाद देशपांडे आवर्जून म्हणतात. बालपणी नाटकाच्या तालमीला जात असताना आई वडिलांनी कायम इतर मुलांप्रमाणेच वागणूक दिली होती. ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर आणि निनाद देशपांडे हे दोघे सख्खे मावसभाऊ आहेत हे खूप कमी जणांना माहीत आहे. सुलभा देशपांडे यांचे संपूर्ण कुटुंबच कला क्षेत्राशी निगडित आहे. त्यांच्या थोरल्या भगिनी ज्योत्स्ना कार्येकर या देखील हिंदी मराठी चित्रपट अभिनेत्री. यतीन कार्येकर हा त्यांचाच मुलगा. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक परिवार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी कलाक्षेत्रांत आपलं योगदान दिल आहे. कलेचा वारसा जपणाऱ्या ह्या मराठमोळ्या कुटुंबाला आमच्या टीमकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा….