गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील बहुतेक मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पुढे असलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. आई कुठे काय करते या मालिकेतील रंजक घडामोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने मालिकेने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. रंग माझा वेगळा, फुलाला सुगंध मातीचा, ठिपक्यांची रांगोळी या मालिका देखील टीआरपीमध्ये पुढे असलेल्या दिसून येतात. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत आता कीर्तीचे आयपीएस ऑफिसर बनण्यासाठीचे ट्रेनिंग सुरू झाले आहे. त्यामुळे फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत तब्बल दोन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

किर्तीला ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनर अग्रीमा पाटील ही व्यक्तिरेखा मालिकेत दाखल झाली आहे ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री मानसी कुलकर्णी हिने. मानसी कुलकर्णी हिने या मालिकेअगोदर अनेक गाजलेल्या मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. जय भवानी जय शिवाजी, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, फु बाई फु, सावधान इंडिया, १७६० सासूबाई , विजेता, अघोर अशा चित्रपट, मालिका तसेच नाटकांमधून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून ती ट्रेनर बनून दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. मानसी कुलकर्णी हिच्या सोबतच आणखी एक अभिनेत्री मालिकेत दाखल होत आहे. केतकी पालव हि अभिनेत्री या मालिकेत कीर्ती सोबत ट्रेनिंग घेताना दिसणार आहे. अर्थात केतकीची भूमिका विरोधी असणार हे निश्चित आहे कारण कीर्तीचे ट्रेनिंग असे सहजासहजी पूर्ण होणे अशक्य आहे. ट्रेनिंग घेत असताना किर्तीला त्रास देणारी केतकी आपली भूमिका कशी वठवते याची उत्सुकता जास्त आहे. केतकी पालव हिने नुकतेच सोनी मराठी वाहिनीवरील कुसुम या मालिकेत इलिशा प्रधान हे विरोधी पात्र साकारले होते.

कुसुम या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे त्यामुळे केतकी पालव फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं, एका पेक्षा एक, ढोलकीच्या तालावर, मराठी तारका, जल्लोष सुवर्णयुगाचा अशा मालिका तसेच डान्स रिऍलिटी शो मधून केतकीने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची झलक दाखवून दिली आहे.मालिकांमधून बहुतेकदा तिच्या वाट्याला विरोधी भूमिकाच आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेत देखील तिची अशाच स्वरूपाची भूमिका असणार आहे. फुलाला सुगंध मातीचा टीआरपी या दोन नव्या येऊ घातलेल्या मराठी अभिनेत्रींमुळे नक्कीच वाढेल यात शंका नाही पण मालिका चालावी यासाठी नवीन कलाकारांची भरती करण्यापेक्षा एखादी नवीच मालिका का सुरु होताना दिसत नाही असा सवाल अनेकजण नेहमीच विचारताना पाहायला मिळतात.