Breaking News
Home / जरा हटके / फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट तिच्या भूमिकेत दिसणार आता ही अभिनेत्री

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट तिच्या भूमिकेत दिसणार आता ही अभिनेत्री

एखाद्या मालिकेतील पात्र रिप्लेस करण्यात येते तेव्हा त्या जागी नविन कलाकाराला पाहून प्रेक्षकांचा हिरमोड झालेला पाहायला मिळतो. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. शुभम आणि कीर्तीच्या जुळून आलेल्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेने काही दिवस तर टीआरपीच्या बाबतीत प्रथम क्रमांक देखील पटकावला होता. मालिका सुरळीत चालू असताना आता या मालिकेत नविन कलाकाराची एन्ट्री करण्यात आली आहे. मालिकेत सोनालीचे पात्र साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये हिने ही मालिका सोडली असल्याचे समोर आल्याने मालिकेच्या प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दर्शवली आहे. सुरुवातीपासून मालिकेत आपण जी भूमिका जगतो ती प्रेक्षकांच्या मनात उतरलेली असते ही भूमिका सोडणे त्या कलाकारासाठीच नाही तर प्रेक्षकांसाठीही कठीण असते.

aishwarya shete and kanchan prakash
aishwarya shete and kanchan prakash

कारण त्या भूमिकेच्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या कलाकाराची वर्णी लागल्यास प्रेक्षक त्यांना स्वीकारायला लवकर तयार होत नाहीत. सोनालीच्या पात्राबाबत असेच काहीसे घडल्याने ही भूमिका आता अभिनेत्री कांचन प्रकाश साकारताना दिसणार आहे. ऐश्वर्या शेट्ये हिने सोनालीचे पात्र आपल्या सहजसुंदर अभिनयाने सुरेख वठवले होते. मात्र काही कारणास्तव तिला ही मालिका सोडावी लागत आहे. या मालिकेअगोदर ऐश्वर्याने ऑल मोस्ट सुफळसंपूर्ण मालिकेतून काम केले होते. ऐश्वर्याच्या जागी आता सोनालीच्या भूमिकेत कांचन प्रकाश झळकणार आहे. कांचन प्रकाश ही मालिका तसेच नाट्य अभिनेत्री आहे. हौशी नाटकातून काम करत असताना कांचनने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले.स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत कांचनने सगुणाचे पात्र साकारले होते. ऐतिहासिक मालिका आणि सगुणाचे दमदार पात्र यामुळे कांचनचे मोठे कौतुक करण्यात आले होते. प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेतून कांचनने छोट्या पडद्यावर पाऊल टाकले. तुझ्या इश्काचा नाद खुळा, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा अशा मालिकांमधून कांचन महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. फुलाला सुगंध मातीचा या गाजलेल्या मालिकेत सोनालीचे पात्र साकारण्याची संधी तिला मिळाली आहे.

actress kanchan prakash
actress kanchan prakash

ती म्हणते ” मी आजपासून तुम्हाला भेटायला येतेय सोनालीच्या भूमिकेत ‘ फुलाला सुगंध मातीचा’ मध्ये आधीच्या सोनालीने तुम्हा सर्वांची मनं जिंकलेली आहेत. मी आशा करते की तुम्ही तेवढंच प्रेम मलाही द्याल तू ऐश्वर्या शेटे या भूमिकेला खूप उंचावर नेऊन ठेवलयस आणि मी ती उंची गाठायचा प्रयत्न नक्की करेन पाहायला विसरू नका ‘ फुलाला सुगंध मातीचा’ रात्री ८:३० वाजता फक्त स्टार प्रवाह वर ” खरं तर हे पात्र रिप्लेस करण्यात आल्याने कांचनसाठी ही भूमिका तेवढीच आव्हानात्मक ठरणार आहे. कारण आजवर ऐश्वर्या शेट्ये हिने तिच्या सहजसुंदर अभिनयाने ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवली होती. त्यामुळे प्रेक्षक आपल्याला स्वीकारतील की नाही या द्विधा मनस्थितीत ती आहे. मात्र कांचन उत्तम अभिनेत्री आहे हे तिच्या वेगवेगळ्या भुमिकेतून पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ती ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात निश्चितच उतरवू शकते असा विश्वास वाटतो. या नवीन भूमिकेसाठी आणि पेललेल्या या आव्हानासाठी कांचन प्रकाश हिला मनःपूर्वक शुभेच्छा.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *