बहुप्रतिक्षित “पवित्र रिश्ता २” या हिंदी मालिकेचे चित्रीकरण ११ तारखेच्या मुहूर्तावर केले गेले. रविवारपासून या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून मानव आणि अर्चनाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकता कपूरने या मालिकेची सूत्रे हाती घेतली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांना टीव्ही वाहिनीवर पाहता येणार आहे. अंकिता लोखंडे आणि शाहीर शेख अर्चना आणि मानवच्या भूमिकेत झळकणार आहेत. यावेळी उषा नाडकर्णी पुन्हा एकदा मानवच्या आईची भूमिका निभावणार असल्याने मराठी प्रेक्षक सुखावला आहे.

आरोग्याच्या कारणास्तव आणि को ‘रो नाच्या काळजीमुळे उषा नाडकर्णी मालिका करणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र आता त्या मानवच्या आईच्या भूमिकेतून पुन्हा एकदा पवित्र रिश्ता मालिकेत दिसणार आहेत. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी शाहीर शेख, उषा नाडकर्णी, अंकिता लोखंडे, असीमा वर्दन, रणदीप रॉय यांना अभिनयाची संधी मिळाली. रणदीप रॉय मानवच्या लहान भावाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. उषा नाडकर्णी, रणदीप रॉय आणि शाहीर शेख या तिघांचा एकत्रित सिन देखील पहिल्याच दिवशी शूट करण्यात आला तर मानव आणि अर्चना यांचा मालिकेतील लूक देखील चर्चेचा विषय ठरत आहे. या कलाकारांसोबतच या मालिकेतून आणखी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला अभिनयाची संधी मिळणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “अभिज्ञा भावे” . अभिज्ञा भावे हिने बहुतेक वेळा मालिकांमधून विरोधी भूमिका साकारलेली आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून ती आता विरोधी भूमिका साकारणार की आणखी काही वेगळ्या भूमिकेत ती दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येते. पवित्र रिश्ताच्या पहिल्या पर्वातून प्रिया मराठे, प्रार्थना बेहरे, सविता प्रभुणे यांना अभिनयाची संधी मिळाली होती.

मधल्या काळात अर्चनाच्या आईची भूमिका अभिनेत्री सुचित्रा बांदेकर साकारणार अशीही जोरदार चर्चा होती मात्र पुढे ही चर्चा इथेच थांबली. त्यामुळे अर्चनाच्या आईची भूमिका कोण साकारणार याबाबतही उत्सुकता आहे. ही भूमिका कोणी मराठी अभिनेत्रीच निभावेल असेही बोलले जात आहे. येत्या काही दिवसात मालिकेतील इतर कलाकारांच्या नावाचा उलगडा होईलच तुर्तास अभिज्ञा भावे या मालिकेचा एक भाग बनणार असल्याने मराठी प्रेक्षक खुश झाला आहे. अभिज्ञा मालिकेत कोणती भूमिका साकारणार याबाबत आता चर्चा पाहायला मिळणार आहे. तिच्या भूमिकेबाबतही तिने अजूनही गुप्तता बाळगली असली तरी येत्या काही दिवसात मालिकेतून ही सर्व पात्र लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत.