तब्बल बारा वर्षानंतर पुन्हा एकदा “पवित्र रिश्ता” या लोकप्रिय हिंदी मालिकेतून मानव आणि अर्चनाची जोडी नव्याने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. याला कारणही तसेच आहे. लवकरच पवित्र रिश्ता या मालिकेचा सिकवल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशांतच्या जाण्यानंतर या मालिकेचा सिकवल यावा आणि त्यातून मानव अर्चनाची जोडी प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा यावि अशी बहुप्रतिक्षित चर्चा आता लवकरच प्रत्यक्षात अवतरणार आहेत. आज ११ जुलै पासून पवित्र रीश्ता या मालिकेचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवसाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने या मालिकेचे शूटिंग सुरू झाले असल्याचे आपल्या चाहत्यांना कळवले आहे. त्यामुळे लवकरच मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकता कपुरच्या बालाजी टेलिफिल्म्सने ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणायचे ठरवले आहे. यातून पुन्हा एकदा मानव आणि अर्चनाची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. अंकिता लोखंडे हिचा अर्चनाच्या गेटअपमधील लूक देखील मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. साध्यासुध्या ड्रेसमधली अर्चना पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकून घेणार हे आता स्पष्ट होत आहे. तर मानवची भूमिका अभिनेता “शाहीर शेख” साकारणार आहे. सुशांतच्या चेहऱ्याशी मिळता जुळता चेहरा म्हणून मानवची भूमिका शाहिरकडे सुपूर्त करण्यात आली आहे. अंकिता आणि शाहीर हे दोघेही शूटिंग दरम्यान मानव आणि अर्चनाच्या भूमिकेत सेम गेटअपमुळे खूपच खुलून दिसत आहेत. अर्थात मालिका सुरू झाल्यावर कथानकाचा लवकरच उलगडा होईल मात्र या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहे.

आरोग्याच्या कारणास्तव उषा नाडकर्णी या मालिकेत नसल्याचे सांगितले जात होते मात्र मालिकेच्या मुहूर्तावेळी त्यांनी सेटवर हजेरी लावली होती त्यामुळे त्या मालिकेत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर रणदीप रॉय, असीमा वर्धन हे कलाकार मालिकेत झळकणार असल्याचे बोलले जात आहे तर अन्य कलाकारांबाबत अद्याप काही उलगडा झाला नसल्याने काही नावे मालिकेने गुलदस्त्यात ठेवणेच पसंत केले आहे. तुर्तास मालिकेचे शूटिंग सुरू झाल्याने मालिकेचे चाहते खूपच सुखावले आहेत. आता मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण मानव आणि अर्चनाला पाहायला प्रेक्षक पुन्हा नव्याने उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत.