आज २५ जानेवारी रोजी बहुप्रतिक्षित, बहुचर्चित “पठाण” हा बॉलिवूड चित्रपट रिलीज झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून पठाण चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत होती. अनेकांनी या चित्रपटाला बॉयकॉट करत त्याला विरोध देखील दर्शवला. मात्र आज हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाहण्यासाठी हाऊसफुल्ल गर्दी केलेली होती असे बोलले जात आहे. हा चित्रपट प्रिबुकिंग झाल्याने काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. तर काही भागात विरोधकांनी चित्रपटगृहात एन्ट्री करून प्रेक्षकांना तिथून हाकलून लावलेले पाहायला मिळाले. एकीकडे चित्रपटाला मिळणारा हा प्रतिसाद पाहून बॉक्सऑफिसवर आज हा चित्रपट छप्पर फाड कमाई करत असल्याचे चित्रपट समीक्षक टर्न आदर्श यांनी म्हटले. त्यामुळे या चित्रपटाच्या स्क्रीन सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत.

एवढेच नाही तर आज ३०० शोज सुद्धा वाढवलेले आहेत. देशभरात पठाण चित्रपटाला ५५०० स्क्रीन देण्यात आले असून जगभरातील प्रतिसाद पाहून स्क्रीनचा हा आकडा ८००० च्या घरात गेलेला आहे. पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल २० कोटी ३५ लाखांचा गल्ला जमवला अशी आकडेवारी समोर येत आहे. दुपारनंतर हा आकडा चाळीस कोटींचा टप्पा पार करेल असे सांगण्यात येते. पठाण चित्रपट बनवण्यासाठी २५० कोटींचा खर्च करण्यात आला होता. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट आपला झालेला खर्च वसूल करणार असे बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे पाच नंतरचे सगळे शो कुठेच बुकिंग केले नसल्याचे चित्र समोर आले आहे. पठाण चित्रपटासाठी स्क्रीन वाढवण्यात आल्या. मात्र प्रेक्षकांनी या शोकडे पाठ फिरवली असे चित्र पुण्यातील चित्रपट गृहांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे ह्या वाढवलेल्या स्क्रीन मुळे मराठी चित्रपटांना आणि इतर भाषिक चित्रपटांनासुद्धा फटका बसत आहे. एकीकडे पठाण चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद मराठी चित्रपटांना मात्र नाहक त्रास देणारा ठरला आहे. २० जानेवारी रोजी ओंकार भोजने आणि ईशा केसकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

मात्र या चित्रपटाला म्हणावा तसा प्राईम टाइम मिळाला नसल्याची खंत चित्रपटाच्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. ईशा केसकर आणि ओंकार भोजने नुकतेच लाईव्ह येऊन चाहत्यांशी गप्पा मारत होते त्यावेळी एका चाहत्याने प्राईम टाईमला सरला एक कोटी चा शो नसल्याचे सांगितले. तेव्हा ईशाने सुद्धा हे मान्य केले की आम्ही प्रमोशनमध्ये कुठेतरी चुकलो. वेड चित्रपटाने सगळीकडे प्रमोशन केलेले पाहायला मिळाले आम्ही त्या लेव्हलला हे प्रमोशन नाही करू शकलो त्यामुळे कदाचित आम्ही मागे पडलो. त्याचमुळे आम्हाला स्क्रीन्स दिल्या गेल्या नाहीत. तुम्ही जर प्रतिसाद दिला तर अजून स्क्रीन मिळाव्यात म्हणून आम्ही सुद्धा नक्की प्रयत्न करू. गावांमध्ये, शहरांमध्ये निदान आम्हाला दोन तरी शोज मिळावेत म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या चित्रपटाच्या बरोबरीला अजून चित्रपट आले आहेत. खूप कॉम्पिटीशन पण आहे. मात्र तरीही आम्ही हार मानलेली नाही. दरम्यान कोल्हापूर, बीड , नांदेड या ठिकाणाहून सरला एक कोटी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल ईशा आणि ओंकारने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.