
पंढरपूरची वारी सुरु झाली तसे विठुरायाचे अनेक गीते आपल्याला ऐकायला भेटतात त्यात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी…,धरिला पंढरीचा चोर… अशी सुपरहिट गाणी लाभलेला चित्रपट म्हणजे “पंढरीची वारी” हा चित्रपट. दर वर्षी आषाढी एकादशीला सह्याद्री वाहिनीवर “पंढरीची वारी” हा चित्रपट दाखला जाणार हे ठरलेले असायचे. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी थेटरमध्ये हाऊसफुलचे बोर्ड लावले होते. आजही हा चित्रपट तितक्याच आपुलकीने आणि आत्मीयतेने पाहिला जातो. जयश्री गडकर, बाळ धुरी, नंदिनी, राघवेंद्र काडकोळ, राजा गोसावी, अशोक सराफ (विरोधी भूमिका) अशा अनेक नामवंत कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या.

चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांची असून याचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले होते रमाकांत कवठेकर यांनी. चित्रपटात पंढरीच्या वारीला जाताना जयश्री गडकर यांच्या कुटुंबाला वाटेतच एक चिमुकला भेटतो आणि येणाऱ्या अडचणींना दूर करत तो या कुटुंबाचे रक्षण करतो. चित्रपटात हा चिमुकला मुका दर्शवला असल्यामुळे कुठलाही संवाद न साधताच तो आपल्या निरागस अभिनयाने साऱ्यांची मने कशी जिंकून घेतो याचे हे सुंदर कथानक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले आहे. मुकाभिनय करून केवळ हावभावाद्वारे अभिनय साकारणे हे खरं तर मोठे आव्हानाचे काम परंतु त्याने ते अतिशय उत्तमरीत्या साकारलेले पाहायला मिळाले होते. साक्षात विठोबाचे रूप साकारणारा हा चिमुकला चित्रपटाच्या शेवटच्या क्षणी साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणण्यास भाग पाडतो असे हे सुंदर कथानक या सर्वच जाणत्या कलाकारांनी आपापल्या भूमिकेतून अतिशय सुरेखपणे दर्शवलेले पाहायला मिळाले. चित्रपटात विठोबा साकारणारा हा बालकलाकार आहे “बकुल कवठेकर” त्याच्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात.

“बकुल कवठेकर” हा बालकलाकार याच चित्रपटाचे दिवंगत दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा मुलगा आहे. या चित्रपटानंतर मात्र बकुल फारसा कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाला नाही. पुढे बकुलने पुण्यातील भारती विद्यापीठातून फाईन आर्टस् चे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवला. मात्र आपले शिक्षण पूर्ण करत असतानाच २००२ साली बकुलचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्यारूपाने हा कलाकार आपण खूप आधीच गमावला याचे दुःख तुम्हा-आम्हा सर्वांनाच कायम राहणार. बकुलचा भाऊ “समीर कवठेकर” हे एक निर्माते म्हणून याच क्षेत्रात कार्यरत आहेत. “बकुल फिल्म्स” नावाने त्यांनी स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली आहे. “स्वराज्यरक्षक संभाजी”, ” स्वराज्यजननी जिजामाता”, राजा शिवछत्रपती” या मालिका तसेच “अजिंठा”, “बालगंधर्व” या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणूनही त्यांनी आपली भूमिका बजावली आहे. खाकी, मंगल पांडे या बॉलिवूड चित्रपटासाठीही त्यांनी काम केले आहे. “बकुल कवठेकर” ह्या बालकलाकाराने ह्या चित्रपटात जे उत्कृष्ट काम केले आहे ते आजही पाहताना पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणत, ह्या बाल कलाकाराला आमच्या कडून मानाचा मुजरा…मराठी रंगभूमी आपला अभिनय कायम स्मरणात ठेवील.