झी मराठी वाहिनीवरील पाहिले न मी तुला या मालिका अभिनेत्रीच्या वडिलांचे दुःखद निधन झाले असल्याचे समोर आले आहे. पाहिले न मी तुला मालिकेतील मुख्य अभिनेत्री म्हणजेच तन्वी मुंडळे हिचे वडील प्रकाश मुंडळे यांचे निधन झाले आहे. ” तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे. खूप प्रेम आबु… see you whenever my time comes…” असे म्हणून आपल्या बाबांच्या आठवणीत तिने भावनिक पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टवर मालिकेतल्या तिच्या सह कलाकारांनी तिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन तिच्यासाठी सहानुभूती व्यक्त केली आहे.

याच मालिकेतील उषामावशी म्हणजेच अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांनी तन्वीच्या ह्या पोस्टवर एक सहानुभूतीची प्रतिक्रिया देऊन तिच्या बाबांना श्रद्धांजली दिली आहे. तन्वी मुंडळे हिचे तिच्या बाबांशी असणारे नाते किती मैत्रीपूर्ण होते हे तिच्या पोस्टवरूनच समजते. माझी वेळ येईल तेव्हा आपण नक्की भेटू अशी भावना तिने आपल्या बाबांप्रति व्यक्त केली आहे. तन्वी मुंडळे ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची. कुडाळ येथेच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्स ग्रुप तिने जॉईन केला आणि इथूनच अभिनयाची ओढ तिला लागली. पुढे पुण्यात ललित कला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले. अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग दर्शवून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. यातूनच “Colorफुल” हा तिचा पदार्पणातील पहिला मराठी चित्रपट ठरला मात्र अजूनही हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात ती सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे.

हा चित्रपट जुलै महिन्यातच प्रदर्शित होणार होता मात्र मनोरंजन क्षेत्रावर लावलेल्या निर्बंधांमुळे त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटात काम केल्यानंतर तन्वीला झी मराठीवरील पाहिले न मी तुला या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकण्याची नामी संधी मिळाली. महेश कोठारे यांनी तन्वीला आपल्या मालिकेत नायिकेच्या भूमिकेसाठी निवडले. मात्र पाहिले न मी तुला या मालिकेला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने काही महिन्यातच आपला गाशा गुंडाळावा लागला. अर्थात तन्वीची भूमिका प्रेक्षकांना आवडूही लागली आणि तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुकही केलेले पाहायला मिळाले होते. मात्र प्रेक्षकांच्या अल्पशा प्रतिसादामुळे आणि कथानक दमदार नसल्याने ही मालिका आटोपती घेण्यावर भर देण्यात आला. अभिनेत्री तन्वी मुंडळे हिने यापुढेही मालिकांत अशीच भरीव कामगिरी देत प्रेक्षकांची मने जिंकावीत हीच सदिच्छा…