मराठी सृष्टीतील बऱ्याचशा कलाकारांनी साईड बिजनेस म्हणून त्यांचा व्हीला किंवा फार्महाऊस भाड्याने देण्याचे निर्णय घेतले आहेत. खरं तर प्राजक्ता माळीच्या फार्म हाऊस नंतर ही संकल्पना अजून पुढे आलेली पाहायला मिळाली आहे. कारण तिच्या पाठोपाठ मेघा धाडे, प्रदीप कबरे यांनीही त्यांचे व्हीला किंवा फार्महाऊस भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या कलाकारांना अर्थार्जनासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. अभिनयाची धुरा सांभाळत ही कलाकार मंडळी भविष्या ची तरतूद करू लागले आहेत ही गोष्ट कौतुकास्पदच म्हणावी लागेल. कारण कित्येक कलाकारांना जेव्हा काम नसते तेव्हा ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडत असतात. पण जर असे उत्पन्नाचे पर्यायी मार्ग त्यांनी निवडले तर निश्चितच त्यांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
याच जोडीला आता पारू मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याने त्याचा व्हीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभिनेता आहे शंतनू गंगणे. शंतनू हे गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच ते निर्माताही आहेत. त्यांचे वडील शिवाजीराव गंगणे हे शिक्षक होते. यासोबतच त्यांना अभिनय, गायन या कलेची आवड होती. तुळजाभवानी मंदिरात ते पुजारी देखील होते. वडिलांच्या अभिनयाचा वारसा शंतनूने अंगीकारला असे म्हणायला हरकत नाही. गेल्याच वर्षी भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. झी मराठीच्या पारू या मालिकेत शंतनू यांनी मोहन कोर्लोस्करची भूमिका साकारली आहे. पोर बाजार, धुरंधर भाटवडेकर, रिंगण, सनई चौघडे, सोयरीक , गाथा नवनाथांची या आणि अशा कितीतरी कलाकृतीतून त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. शंतनू गनगणे हे गेली अनेक वर्षे पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी कांचन या पेशाने शिक्षिका आहेत. नुकताच पुण्यात डेव्हलप केलेला त्यांचा व्हीला त्यांनी आता भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.
” व्हाइट लोटस व्हीला” असे पुण्यातील त्यांच्या या व्हीलाचे नाव आहे. नऱ्हे येथील स्वामीनारायन मंदिरा पासून जवळच त्यांचा हा व्हीला दिमाखात उभारण्यात आला आहे. या व्हीलाच्या चहू बाजूने डोंगर रांगा आहेत. त्यामुळे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक नक्कीच त्यांच्या व्हीलाला भेट देऊ शकतात. राहण्याची, खाण्याची उत्तम सोय, शिवाय छोटासा स्विमिंगपुल आणि चहू बाजूने असलेला गार्डन एरिया यामुळे हा व्हीला तुमचे लक्ष नक्कीच वेधून घेऊ शकतो. या व्हीलाची एक झलक शंतनू यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोबतच तिथे असणाऱ्या सोयी सुविधांचे डिटेल्स देखील देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला जवळच कुठे फिरायला जायचे असेल तर त्यांच्या व्हीलाला नक्की भेट देऊ शकता.