Breaking News
Home / जरा हटके / मराठी चित्रपटातील खतरनाक व्हिलनची नात झळकतीये मराठी मालिकेत

मराठी चित्रपटातील खतरनाक व्हिलनची नात झळकतीये मराठी मालिकेत

गडहिंग्लज येथील गणपतराव गोविंदराव भुतकरांच्या घरी ८ नोव्हेंबर, १९३६ रोजी राजशेखर यांचा जन्म झाला. राजशेखर यांचे खरे नाव जनार्दन भूतकर. कुटुंबात राजशेखरजी हे शेंडेफळ! त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते. वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय होता आणि नाटकांतून ते छोट्या छोट्या भूमिका साकारत असत. अभिनयाचे बाळकडू वडिलांकडूनच त्यांना मिळाले. वडिलांना नाटकांमध्ये काम करताना पाहून, आपणही ‘अभिनेता’ बनायचं, असं त्यांनी ठरवलं. १९५० साली गडहिंग्लजहून कोल्हापूरला ते निघून आले. कोल्हापूरला आल्यावर नाना जोशी यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. आपणही केव्हातरी हा रंगमंच गाजवू, ही आस उराशी बाळगत, नाना जोशींच्या नाटकांमधून ते ‘प्राँप्टरची’ भूमिका बजावू लागले.

actor rajshekhar son
actor rajshekhar son

हा सिलसिला काही वर्षे चालला आणि अखेर ‘गणपत पाटील’ दिग्दर्शित ‘ऐका हो ऐका’ या नाटकामधून राजशेखरजी रंगभूमीवर अवतरले. ऐन विशीत असताना राजशेखरजी यांनी ६० वर्षांच्या म्हातार्‍याची व्यक्तिरेखा साकारली. राजशेखर यांच्याकडे असणारे हे कलागुण पाहून गणपत पाटील त्यांना, ‘मराठी सिनेसृष्टीचे चित्रतपस्वी’ समजल्या जाणार्‍या भालजी पेंढारकरांकडे घेऊन गेले आणि हाच राजशेखरजी यांच्या जीवनाचा टर्निंग पॅाईंट ठरला. भालजी पेंढारकरांनी त्यांच्या ‘आकाश गंगा’ या चित्रपटात पोलिसाचा रोल त्यांना देऊ केला. या चित्रपटामध्ये राजशेखरजी यांनी दुहेरी व्यक्तिरेखा साकारली. पुढे ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटांमधून ते खलनायक म्हणून पडद्यावर झळकले. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटामध्ये तब्बल पाच भूमिका त्यांनी साकारल्या! पण, राजशेखरजी यांना खलनायक म्हणून ओळख मिळवून दिली, ती भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘साधी माणसं’ या चित्रपटाने. राजशेखर यांचे हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे ते भालजींकडे पटकथा लिहिण्याचे काम करत होते. भालजींनी जनार्दन भूतकर यांचे नाव ‘राजशेखर’ ठेवले आणि राजशेखर यांचा खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला. आवाजातली जरब आणि नजरेतला करारीपणा यामुळे राजशेखर खलनायकाच्या भूमिकेत चांगलेच रुळले या भूमिकांमुळे कित्येकदा त्यांना ग्रामीण भागातील स्रियांकडून शिव्या खाव्या लागत हीच त्यांच्या अभिनयाची खरी पावती ठरली.

actress krushna rajshekhar
actress krushna rajshekhar

‘मल्हारी मार्तंड’, ‘बारा वर्ष सहा महिने तीन दिवस’, ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ‘धर्मकन्या’, ‘लाखात अशी देखणी’ (१९८२), ‘जोतिबाचा नवस’ (१९७५), ‘वारणेचा वाघ’ (१९८४) अशा अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून स्वतंत्र ठसा उमटवला. ‘रिश्ते-नाते’, ‘छोटे बाबू’, ‘युगांतर’ या दूरदर्शन मालिकांतूनही काम केले. त्यांनी जवळपास १०० हून अधिक चित्रपटात खलनायक साकारला. राजशेखर यांच्या पाठोपाठ त्यांचे धाकटे चिरंजीव स्वप्नील राजशेखर मराठी सृष्टीत चांगलेच रुळलेले पाहायला मिळाले. वडीलांप्रमाणे सुरुवातीला खलनायकाच्या भूमिका स्वप्नील यांनी लीलया पार पाडल्या. स्वप्नांच्या पलीकडले, कुलस्वामिनी, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, वीर शिवाजी, माणूस एक माती, स्वराज्यजननी जिजामाता, स्वराज्यरक्षक संभाजी, एकच प्याला, प्रेम पॉईजन पंगा अशा मालिका चित्रपट तसेच नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. राजशेखर घराण्याची तिसरी पिढी म्हणून स्वप्नील राजशेखर यांची कन्या “कृष्णा राजशेखर” हिने मालिका सृष्टीत पदार्पण केले आहे. दोनी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही नवी मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होत आहे. या मालिकेत कृष्णा राजशेखर हिने महाराणी जानकीबाई यांची भूमिका साकारली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी आहेत. पदर्पणातील पहिलीच ऐतिहासिक मालिका आणि दमदार भूमिका यामुळे कृष्णा राजशेखर खूपच खुश आहे. कृष्णाने अभिनयाचे धडे गिरवले असून कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे शिवाय गाण्याची देखील तिला आवड आहे. स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही कृष्णाची पहिलीच टीव्ही मालिका आहे. या मालिकेअगोदर हिमालयाची सावली या नाटकात तिने कृष्णाबाईची भूमिका निभावली होती. मालिकेतील जानकीबाईच्या भूमिकेसाठी कृष्णा राजशेखर हिला मनःपुर्वक शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *