
लक्ष्य या मालिकेच्या लोकप्रियतेनंतर स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा सिकवल असलेली नवे लक्ष्य ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. या मालिकेत सोहम बांदेकर, अभिजित श्वेतचंद्र, उदय सबनीस, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे मालिकेतील डॅशिंग इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाड याचा खऱ्या आयुष्यात नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. ही भूमिका साकारली आहे अभिनेता अभिजित श्वेतचंद्र याने. काल शनिवारी म्हणजेच ११ जून २०२२ रोजी अभिजित श्वेतचंद्र आणि सेजल वर्दे यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. अभिजित श्वेतचंद्र यांचे पूर्ण नाव आहे अभिजित चंद्रकांत भगत.

वडील चंद्रकांत भगत आणि आई श्वेता भगत यांचे नाव तो आपल्या नावासमोर लावतो. आपल्या या यशामागे आईवडिलांचे मोठे श्रेय आहे असे तो म्हणतो. अभिजित मूळचा अलिबाग रायगड जिल्ह्यातला. मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अभिजीतने खाजगी कंपनीत नोकरी केली होती मात्र या नोकरीत त्याचे फारसे मन रमेना म्हणून त्याने आपल्या आवडत्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. अभिनय हे आपले आवडते क्षेत्र. स्ट्रगल करून त्याने नाट्य सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. मोहें पिया हे त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक. या नाटकात त्याने घटोत्कचची भूमिका निभावली. तालीम हा त्याने अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटानंतर अभिजीतला मराठी मालिकांमधून झळकण्याची संधी मिळाली. बापमाणुस, बाजी, गणपती बाप्पा मोरया, साजणा या मालिकांमधून अभिजित महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला. त्याने चाफेकर ब्रदर्स, रेड सारख्या हिंदी चित्रपटातून अभिनय साकारला आहे. नवे लक्ष्य या मालिकेतून त्याने साकारलेली डॅशिंग इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाडची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. अभिजितची होणारी पत्नी सेजल वर्दे ही देखील अभिनेत्री आहे.

२०१७ साली सेजलने ‘रायगड क्वीन’ ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. त्याच वर्षी तिने ‘मिस लोणावळा’ बनण्याचा मानही पटकावला आहे. तर २०१८ साली ‘मिस बेस्ट स्माईल फॅशनिस्ट’ आणि ‘ मिस अलिबाग’ हे दोन्ही किताब पटकावले आहेत. २०१९ साली ‘मुलुंड क्वीन’ या सौंदर्य स्पर्धेत तिने ‘मिस कॉन्फिडन्ट’ होण्याचा मान पटकावला आहे. सेजलने मॉडेलिंग क्षेत्रातही आपलं नाव कमावले असून काही साड्यांच्या ब्रॅण्डसाठी तिने मोडेलिंग केलं आहे. एवढेच नाही तर ‘आई तू एकविरा’ या म्युजिक व्हिडीओमध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत झळकली आहे. कारकिर्दीच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना अभिजीतने सेजल सोबत साखरपुडा केला. आता हे दोघे कधी लग्न करणार याची अधिक उत्सुकता आहे. अभिजित श्वेतचंद्र आणि सेजल वर्दे यांचे साखरपुड्यानिमित्त खूप खूप अभिनंदन!.