
सकाळचा नाश्ता म्हटलं कि आजकाल खुप प्रकार पाहायला मिळतात पण मिसळ म्हटलं कि तोंडाला पाणी सुटणार नाही असा एकही नाशिककर शोधून सापडणार नाही. मिसळ म्हणजे नाशिककरांचा जीव कि प्राण. नाशिकात मिसळ चे अनेक प्रकार पाहायला मिळतात तोंडाला झटका बसेपर्यंत आणि पोटात जाईल तितकं भरपेट मिसळ खाताना नाशिककर पाहायला मिळतात. “लेका जेवण न्हाय भेटलं तरी बी चाललं पण पोटात जागा हाय तवर हाण मिसळ’ असे म्हणणारी अनेक मंडळी पाहायला मिळतात.अशी एक प्रसिद्ध महिला “सीताबाईची मिसळ” म्हणून नाशिक मध्ये प्रसिद्ध होत्या नुकतंच त्यांचं अल्पश्या आजाराने निधन झालं. त्याचा जीवन प्रवास खूपच खडतर होता पण त्यांची जिद्द त्यांना खूप काही देऊन गेली ….

सीताबाई मोरे ह्या सीताबाईच्या मिसळ ह्या नावाने नाशिकच्या पंचवटीत प्रसिद्ध होत्या. सीताबाईंचं लग्न झाल्यानंतर काही दिवसातच नवऱ्याला लखवा झाला त्यात तीन मुले आणि एक मुलगी ह्यांची जबाबदारी त्यांच्या एकटीवर येऊन पडली. सुरवातीला दुधडेअरी सांभाळत त्यांनी हळूहळू मिसळ चालवायला सुरवात केली. सकाळी ५ ला उठून दूध काढणे नंतर ११ पर्यंत हॉटेल आणि नंतर घर पाहणे असा त्यांचा दिनक्रम चालायचा. सोबतीला एकही कामगार न घेता तब्बल ५० वर्ष त्यांनी खवय्यांना आपल्या मिसळीचा आस्वाद चाखायला लावला फक्त मिसळचं नाही तर त्यांची शेव देखील तितकीच प्रसिद्ध. स्वतःच्या हातानी सर्वकाही स्वतःच बनवायचं आणि खायला घालायचं मग समोरच्याने कधी काही जास्तीच द्या म्हटलं तरी संकोच न बाळगता मागेल तितकं द्यायचं. ह्यामुळेच त्या सर्वांच्या आवडीच्या बनल्या जबाबदारीची जाणीव माणसाला कधी थकू देत नाही हे तितकंच खरं. व्यापारी असो एखादा सराफ असो किंवा एखादा सामान्य माणूस सर्वांशी त्या अगदी आपुलकीने वागल्या. त्यांचा एक मुलगा महापालिकेत काम करतो. तर दुसरा मुलगा प्रेसमध्ये कामाला आहे. सीताबाईंचा जावई देखील पीएसआय आहेत. सर्वांचं शिक्षण अगदी उत्तम झालय ह्याचंच हे उदाहरण. मेहनती आणि इमानदारी राखणाऱ्या सीताबाई मोरे ह्यांना आमचा अखेरचा मानाचा मुजरा ..