येत्या काही दिवसात मराठी सृष्टीतलं लाडकं कपल म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर विवाहबद्ध होत आहेत. नुकतेच त्यांचे केळवण साजरे करण्यात आले असून हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. हार्दिक आणि अक्षया विवाहबंधनात अडकण्याअगोदर एका प्रसिद्ध अभिनेत्रीने कुठलाही गाजावाजा न करता लग्न केलं आहे. ही अभिनेत्री आहे नेहा जोशी. नुकतेच नेहाने ओंकार कुलकर्णी सोबत अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं आहे. सोशल मीडियावरून नेहा आणि ओंकारने आपल्या लग्नसोहळ्याचे काही खास फोटो शेअर करून ‘फायनली मॅरीड’ असे कॅप्शन दिले आहे. नेहा आणि ओंकारच्या या बातमीवरून मराठी सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

का रे दुरावा या लोकप्रिय मालिकेत नेहाने रजनीचे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे नेहाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. पोश्टर बॉईज, नशीबवान, झेंडा, एक महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर, मिडीयम स्पायसी, अवघाची संसार, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, फर्जंद, न्यूड, आठशे खिडक्या नऊशे दार, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, सुंदर माझं घर या मराठी चित्रपटातून आणि मालिकांमधून नेहाने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. मराठी सृष्टीतील एक सशक्त नायिका अशीही तिची ओळख आहे. मालिका चित्रपटातून बहुतेकदा नेहाने सहाय्यक तसेच विरोधी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. दृश्यम २, हवा हवाई अशा हिंदी चित्रपटाचा ती एक भाग बनली आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच नेहाने आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेतून सहभाग दर्शवला होता. क्षण एक पुरे या व्यावसायिक नाटकामुळे नेहा प्रकाशझोतात आली. ऊन पाऊस या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. नेहा जोशी आणि ओंकार कुलकर्णी हे दोघेही एकाच क्षेत्रात कार्यरत आहेत. ओंकार हा लेखक आणि दिग्दर्शक आहे. काही नाटक आणि शॉर्टफिल्मचे लेखन त्याने केले आहे.

नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकाचे त्याने लेखन केले असून या नाटकात सुमित राघवन आणि नेहा जोशी एकत्र झळकले आहेत. याच नाटकामुळे या दोघांची ओळख झाली असे बोलले जाते. ओंकारने सस्ता नशा या शॉर्टफिल्मचे लेखन तसेच दिग्दर्शन केले आहे. या शॉर्टफिल्मला चित्रभारती शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजले गेले होते. ओंकार आणि नेहा मराठी सृष्टीशी जोडले गेले असल्याने त्यांचे एकमेकांवरील प्रेम बऱ्याच जणांना माहीत होते. त्यामुळे लग्नाचे फोटो शेअर करताच त्यांच्यावर लाईक्स आणि अभिनंदनाचा पाऊस पडत आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्या तर दिल्या आहेतच पण अश्या साध्य सोप्या पद्धतीने लग्नगाठ बांधली ह्याच देखील तोंडभरून कौतुक जाताना पाहायला मिळत आहेत. नेहा जोशी आणि ओंकार कुलकर्णी या नवविवाहित दाम्पत्यास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!.