हे चुकून घडलं मी त्या व्यक्तीची माफी मागण्यासाठी त्याला शोधत होतो पण… दिग्दर्शकाच्या सारवासारव नंतर नाना पाटेकर यांचे उत्तर

सेल्फी घेण्यासाठी पुढे आलेल्या एका तरुणाला नाना पाटेकर कानाखाली वाजवतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. काल दुपारी जर्नी या चित्रपटाच्या सेटवर हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले. सेल्फी घेण्यासाठी आलेला हा तरुण अचानकपणे नाना पाटेकर यांच्या पुढ्यात उभा राहतो आणि आपल्या मोबाईल फोनमध्ये त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण जसा हा तरुण नाना पाटेकर यांच्या समोर येतो तशी त्याच्यावर ते जोराची टपली मारतात आणि तिथून बाजूला जाण्यास सांगतात. यावेळी नाना पाटेकर यांचा चेहऱ्यावरचा तो संताप स्पष्टपणे दिसून आल्याने नेटकऱ्यांनी नाना पाटेकर यांना प्रचंड ट्रोल केलेलं होतं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ दिवसभर व्हायरल होत असल्याचे पाहून आणि यामुळे नाना पाटेकर ट्रोल होत आहेत हे पाहून जर्नी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी याचे स्पष्टीकरण देण्याचे ठरवले. हा एक चित्रपटाचाच एक भाग आहे आम्ही शूट करत असताना नाना पाटेकर एका व्यक्तीला मारताना दाखवले आहेत. पण अचानक ही दुसरीच व्यक्ती समोर आल्याने हा क्रू मेम्बर पैकी कोणीच नव्हता हे नंतर समजले. अशी सारवासारव दिग्दर्शकाने केलेली पाहायला मिळाली. त्यानंतर आता स्वतःच नाना पाटेकर यांनीही आपल्या या कृत्याचे स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत नाना पाटेकर यांनी म्हटले आहे की, ” काल जो व्हिडीओ दिवसभर व्हायरल झाला त्याचे मी इथे स्पष्टीकरण देतो की आम्ही जर्नी या चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्यात मी एकाला कानाखाली वाजवतो असा एक सिन असतो तो व्यक्ती माझ्या डोक्यावरची टोपी हलवतो म्हणून मी तसे करतो असा तो सिन होता. या सिनचा एक टेक झाल्यानंतर आम्ही पुन्हा तो सिन रिटेक केला पण तेवढ्यात दुसरीच कोणीतरी व्यक्ती माझ्याकडे आली.
मला वाटलं तो आमच्याच टीमचा व्यक्ती आहे म्हणून मी त्याला सीनमध्ये सांगितल्याप्रमाणे मारत असतो. त्यानंतर त्याला बाजूला जायला सांगतो. पण हा क्रू मेम्बर नसल्याचे मला सांगण्यात आले. तेव्हा हे चुकून घडलं असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्या व्यक्तीची माफी मागण्यासाठी त्याला शोधत होतो पण तोपर्यंत तो व्यक्ती तिथून निघून गेलेला होता. त्याच्याच कोणी मित्राने हा व्हिडीओ शूट केला असावा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मी कधीच कोणाला असं करत नाही. सगळ्यांना फोटो काढून देत असतो. ही गोष्ट मी जाणूनबुजून केलेली नाही. प्रेक्षक आम्हाला नेहमीच सपोर्ट करत असतात. त्या मार्केट मध्येही त्यावेळी खूप गर्दी होती पण लोकांकडून कुठलाही त्रास आम्हाला झाला नाही. लोकांचं एक एवढं प्रेम मिळत असतं त्यामुळे कधीच कोणती अडचण येत नाही. पण ही जी घटना घडली ती चुकून घडली मी त्याची माफी देखील मागायला तयार होतो पण तो व्यक्ती तिथून निघून गेला होता”. असे स्पष्टीकरण नाना पाटेकर यांनी या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर दिलं आहे.