निकाल माझ्या बाजूने लागलाय आणि लवकरच पाटेकरांना योग्य ती शिक्षा मिळेल…निर्दोष मुक्तता मिळूनही नानांवर तनुश्रीची आगपाखड

नुकतेच मी टु प्रकरणी नाना पाटेकर यांना न्यायालयाकडून क्लिनचिट देण्यात आली असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहे. २००८ साली घडलेल्या प्रकरणात तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचे आरोप लावले होते. २०१८ मध्ये यासंदर्भात तिने नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पण आता नाना पाटेकर यांना निर्दोष ठरवून ही फाईल बंद केल्याच्या बातम्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. पण यामुळे तनुश्री दत्ता मात्र पुरती भडकली आहे.
‘न्यायालयाने हा निकाल माझ्या बाजूने दिलाय आणि लवकरच त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल’ असा दावा तनुश्री दत्ताने दिलेल्या खुलाशात केला आहे. नाना पाटेकर यांची पीआर टीम याबद्दल खोट्या अफवा पसरवत आहेत. माझ्याकडे यासंदर्भात सगळे पुरावे आहेत. नाना पाटेकर ढोंगी माणूस आहे. त्याला या वर्षात नक्कीच नरक यातना भोगाव्या लागतील. या प्रकरणाचे कामकाज अजूनही बाकी आहे. न्यायालयाने आतापर्यंत माझ्याच बाजूने निर्णय दिला आहे. हे फक्त बाहेर येऊ नये यासाठी नानांची पीआर टीम काम करत आहे.

हे प्रकरण मिटवण्यासाठी नाना पाटेकर यांनी प्रयत्न केले आहेत पण कोर्टाने त्यांची ही मागणी धुडकावून लावली आहे. निश्चितच न्यायालयीन प्रक्रिया ही खूप किचकट असते त्यामुळे यात अजून थोडा वेळ जाणार आहे. पण यासगळ्यात निकाल माझ्या बाजूने लागणार हे निश्चित आहे. जे कोणी अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत त्यांच्यावर मी नक्कीच कायदेशीर कारवाई करणार आहे. असे म्हणत तनुश्रीने न्यायालयीन प्रक्रियेबाबतचे काही पुरावे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही केलं तरी तनुश्री काहीना काही करून पुन्हा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे.