स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री रविवारी १९ डिसेंबर २०२१ रोजी विवाहबद्ध झाली आहे. मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेतील आर्या म्हणजेच अभिनेत्री श्वेता अंबिकर आणि अभिनेता दिग्दर्शक अमेय गोरे यांचा कल मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला. दोन दिवसांपासून श्वेताच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती. मेहेंदि आणि हळदीच्या सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी तिने केळवण साजरे झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावरून येत्या काही दिवसातच आर्या खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधणार असल्याचे निश्चित झाले होते.

मालिकेत आर्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे ‘श्वेता अंबिकर’. शौनक आणि साजिरीचे लग्न जुळावे म्हणून आर्याने खूप प्रयत्न केले होते. त्यामुळे मालिकेतील आर्या हे पात्र प्रेक्षकांची वेळोवेळी दाद मिळवताना दिसले आहे. साजिरी, विलास, रोहन, आज्जी याप्रमाणे आर्याचे पात्र देखील मालिकेत खूपच भाव खाऊन जाताना दिसले आहे. मुलगी झाली हो मालिकेमुळे श्वेताला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. ही लोकप्रियता अनुभवत असतानाच तिने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ललित कला केंद्र मध्ये श्वेताची अमेय गोरे याच्यासोबत मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. श्वेता आणि अमेय काल विवाहबद्ध झाले आहेत. अमेय आणि श्वेता यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ओळख आहे. अमेय स्वतः लेखक आणि दिग्दर्शक आहे यासोबतच त्याने काही नाटकांमधून अभिनय देखील साकारला आहे. याशिवाय तो स्वतःची एक नाट्य अकॅडमी चालवत आहे आणि यातून अनेक नवख्या कलाकारांना अभिनयाचे धडे त्याने दिले आहेत. श्वेता अंबिकर ही मूळची पुण्याची. अभिनयाची आवड असलेल्या श्वेताने ललीतकला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले होते. अभिनयाच्या प्रवासात तिला अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटातून काम करता आले.

नाटकांतून काम करत असताना श्वेताने माझे मन तुझे झाले या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. दुर्वा, दिल दोस्ती दुनियादारी, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजी या मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी तिला मिळत गेली. छोट्या छोट्या भूमिका मी करणार नाही या ठाम मतावर असलेल्या श्वेताने गाजलेल्या मालिकांमधून आजवर अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. अगदी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील छोट्या राणूअक्का असो वा दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील रेवा या भूमिकांमुळे श्वेताला नवी ओळख मिळत गेली. अभिनयाचा ठसा उमटवत असताना शॉर्टफिल्ममधूनही ती प्रेक्षकांसमोर आली. अभिनयाचा तिचा प्रवास उल्लेखनीय कामगिरी करणारा ठरला आहे त्याचमुळे श्वेता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करताना दिसली. श्वेता आणि अमेयच्या लग्नात मुलगी झाली हो या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. विलास पाटील म्हणजेच अभिनेते किरण माने हे देखील श्वेताच्या लग्नाला उपस्थित राहिले होते. श्वेता अंबिकर आणि अमेय गोरे यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा…