मागच्या काही दिवसांपासून मुलगी झाली हो या मालिकेचे शूटिंग गोव्यामध्ये केले जात होते. परंतु गोवा सरकारच्या निर्बंधामुळे गोव्यात शूटिंग होत असलेल्या सगळ्याच मालिकांना नुकतीच स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे अगबाई सुनबाई ही मालिका असो वा मुलगी झाली हो या सर्वच मालिका धोक्यात आल्या आहेत. यावर पर्यायी मार्ग काढत लवकरच मुलगी झाली हो या मालिकेचे चित्रीकरण गुजरातमध्ये केले जाईल असे सांगण्यात येत आहे त्यामुळे मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना यापुढेही असेच पाहायला मिळतील असे आश्वस्त केले जात आहे.

या मालिकेत विलासचा मुलगा आणि माऊच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल आज काही गोष्टी जाणून घेऊयात… मालिकेत माऊचा भाऊ म्हणजेच रोहन पाटीलची भूमिका साकारली आहे अभिनेता “सृजन देशपांडे” ह्याने. मालिकेतला रोहन काही दिवसांपूर्वीच आर्यासोबत विवाहबद्ध झाला होता. ही भूमिका विरोधी असली तरी त्याच्या सहजसुंदर अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सृजन बद्दल जाणून तुम्हाला कौतुक वाटेल की, सृजन येळवण गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध समाजसेवक, राजकीय व्यक्तिमत्व आणि शिक्षणप्रेमी चंद्रकांत देशपांडे यांचा नातू आहे एवढेच नाही तर प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता “राजेश देशपांडे” यांचा तो मुलगा आहे. पुढचं पाऊल ही मालिका असो वा कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक, करून गेलो गाव , हिमालयाची सावली, धुडगूस , धनंजय माने इथेच राहतात अशा अनेक सुन्दर कलाकृतींचे अभिनय तसेच दिग्दर्शन त्यांनी केले आहे. सृजनचे काका रोहन देशपांडे हेही एक उत्तम लेखक, दिग्दर्शक व संकलक आहेत. त्याची आई रूईया महाविद्यालयात एकांकिका करीत होत्या.

सध्या त्या कर्णबधीर मुलांना शिकवतात वडील, काका आई यांचे लहानपणापासूनच योग्य मार्गदर्शन त्याला मिळत गेले आणि त्यामुळे सृजनला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला असेही म्हणायला हरकत नाही. त्यातून, लहानपणापासूनच त्याला अभिनयाचे वेड म्हणून नाटुकली, एकांकीका, नृत्य अशा स्पर्धांमध्ये तो नेहमीच सहभाग दर्शवत असे. मुलगी झाली हो ही त्याने अभिनित केलेली पहिलीच मालिका आहे या मालिकेतून त्याने साकारलेले रोहनचे पात्र विशेष लक्षवेधी ठरले आहे. पदार्पणातच हुरळून न जाता आपला अभिनय अधिक कसा खुलेल याच्यावर तो भर देत आहे शिवाय कॉलेजचे शिक्षणही त्याला पूर्ण करायचे आहे त्यामुळे अभिनय आणि शिक्षण अशी तारेवरची कसरत सध्या तो करतो आहे. मुलगी झाली हो या मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला आहे मालिकेतील पाटील कुटुंबावर भरभरून दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच म्हणावी लागेल. मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आणि त्यातील पात्र देखील प्रेक्षकांना आवडू लागली म्हणूनच मालिका यापुढेही अशीच भरभराटी घेवो आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहो हीच सदिच्छा…