स्टार प्रवाह वाहिनीवर “मुलगी झाली हो” ही लोकप्रिय मालिका प्रसारित होत आहे. अल्पावधीतच लोकप्रियता मिळालेल्या या मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा अगदी यशस्वीपणे पार पाडला आहे. परंतु सध्या मालिकेचे चित्रकरण थांबवण्यात आले असून मालिकेबाबत पुढील काही उपाययोजना येईस्तोवर सर्वच कलाकार आपापल्या घरी रवाना झाले आहेत. नुकतेच मालिकेतील शौनकची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला अज्ञातांकडून ५० हजारांची लूट केली असल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे…

मुलगी झाली हो या मालिकेत शौनक जहागीरदार हे पात्र साकारले आहे “योगेश सोहनी” या अभिनेत्याने. शनिवारी मुंबई पुणे एक्सप्रेसने जात असताना योगेशसोबत एक खूपच वाईट घटना घडली आहे. योगेश आपल्या चार चाकी गाडीने जात असताना शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिट जवळ ही घटना घडली होती. एक्सप्रेस वे वरून पुण्याला जात असताना पांढऱ्या रंगाच्या चार चाकीच्या एका ड्रायव्हरने योगेशला गाडी थांबवण्याचा ईशारा केला. ते पाहून कुठलाही विचार न करता योगेशने तात्काळ आपली गाडी थांबवली. त्या ड्रायव्हरने योगेशला जाब विचारत ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे’ असे म्हटले. त्यामुळे एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. तुझ्यावर कायदेशीर तक्रार होऊ शकते जर असं नसेल करायचं तर एक लाख पंचवीस हजार रुपये दे . आम्ही तुझ्याविरुद्ध कुठलीही तक्रार करणार नाही असे म्हणून योगेशकडे भरभक्कम पैशाची मागणी केली. या घटनेमुळे योगेश पुरता घाबरला दरम्यान त्या इसमाने दमदाटी शिवीगाळ करून तिथल्याच एटीएम मधून योगेशच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले . हातात पैसे मिळताच तो व्यक्ती ताबडतोब तिथून निघून गेला.

काहीतरी चुकतंय असे म्हणून या सर्व घटनेचा संशय येताच योगेशने तात्काळ अपघात झालेल्या घटनांची माहिती घेतली मात्र दरम्यान यात कुठेही अपघात झाला नसल्याची माहिती त्याला नव्याने उलगडली. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच त्याने सोमवारी शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या अज्ञात व्यक्तिविरोधात त्याने रीतसर तक्रारही नोंदवली. भीती दाखवुन आणि दमदाटी करून त्या इसमाने योगेशकडून तब्बल ५० हजार रुपये लाटले असले तरी या घटनेतून तो अगदी सुखरूप बचावला आहे. परंतु त्याच्यासोबत घडलेली ही घटना खूपच भीतीदायक म्हणावी लागेल. सुदैवाने त्या इसमाने त्याला कुठली दुखापत केली नाही हे त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे. योगेश सध्या मुलगी झाली हो या मालिकेत शौनक चे पात्र साकारत आहे. या भूमिकेमुळे योगेश प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. याअगोदर त्याने अस्मिता मालिकेत डिटेक्टिव्ह साकारला होता त्या भूमिकेचे ही खूप कौतुक झाले होते. तुर्तास योगेश या घटनेतून सुखरुप बचावला हे महत्त्वाचं…