सध्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्यांचा बोलबाला आहे ते भारतातील प्रख्यात उदयोजक आणि अंबानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घरात लवकरच एक मुलगी माप ओलांडून सून म्हणून येणार आहे. मुकेश आणि नीता यांचा धाकटा मुलगा अनंतच्या बोटात तिच्या नावाची अंगठी सजली आहे. २९ डिसेंबरच्या दिवशी राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याचा शाही सोहळा झाला. अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याचे फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाले आहेत. लवकरच दोघांचं लग्न होणार आहे. अंबानी यांच्या आलिशान घरात लवकरच सून म्हणून येणारी राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ आणि व्हाईस-चेअरमन वीरेन आणि शैला मर्चंट यांची लेक असली तरी तिने तिची एक ओळख बनवली आहे.

अनंत अंबानी याच्या साखरपुड्याची बातमी पसरताच राधिकाविषयी जाणून घेण्याची नेटकऱ्यांनाही उत्सुकता लागली होती. अर्थात अनंत आणि राधिका यांच्या नात्याविषयी काही महिन्यांपासून बातम्या येतच होत्या. अंबानी यांची मोठी सून श्लोका हिच्या लग्नात राधिकाने डान्स केला होता, तसेच अंबानी यांच्या सर्व कौटुंबिक कार्यक्रमात राधिकाची उपस्थिती असायची. इतकेच नव्हे तर गेल्यावर्षी या दोघांच्या लग्नाची अफवाही पसरली होती. मात्र अंबानी आणि मर्चंट या दोन्ही कुटंबांनी यावर पडदा टाकला होता. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी या दोघांचे कुटुंबीय एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात, त्यामुळे राधिका आणि अनंत यांचीही चांगली मैत्री होती. त्याच मैत्रीला नात्याचे रूप देण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला. राधिका ही भरतनाट्यम नृत्यात पारंगत असून गुरू भावना ठकार यांच्याकडे तिने नृत्याचे धडे गिरवले आहेत. राधिकाचा भरतनाट्यमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचा अरंगेत्रम हा गुरूंना समर्पित केला जाणारा पहिला कार्यक्रम मुकेश आणि अंबानी यांनीच आयोजित केला होता. या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. राधिका मर्चंटने न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे आणि एओ पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहे. काही दिवसांपूर्वीच तिने वडीलांच्या एन्कोअर हेल्थकेअर या कंपनीच्या संचालकपदाचीही सूत्रे हाती घेतली आहेत.

ट्रेकिंगसाठी राधिका खूप वेडी आहे. ती वेळ मिळेल तेव्हा ट्रेकिंगला जाते. शिवाय तिला स्विमिंगचीही आवड असून ती जलतरणात कुशल आहे. राधिकाला कॉफी खूप आवडते, कोणत्याही वेळी ती कॉफी पिऊ शकते. एकीकडे राजस्थानमधील नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात शाही थाटात अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा तर झालाच पण या निमित्ताने दोघांनी काही सामाजिक बंधही जपले. अनंत आणि राधिका बुधवारीच राजस्थानमध्ये दाखल झाले होते, तर गुरूवारी दोघांचे कुटुंबीय व मित्रपरिवार राजस्थानमध्ये दाखल झाले. दोघांच्या साखरपुड्यानिमित्ताने राजस्थान परिसरातील आदिवासी समाजातील ७ ते ८ हजारजणांना जेवण देण्यात आले. तसेच अनंत आणि राधिका यांनी श्रीनाथजी मंदिराच्या गोशाळेतील गायींना गुळाची लापशी खाऊ घातली. साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्रीनाथजी मंदिर असलेल्या शहरातील सर्व घरांमध्ये मिठाई पाठवण्यात येणार आहे. अंबानी आणि मर्चंट कुटुंबीयांची श्रीनाथजी यांच्यावर श्रध्दा असल्याने दोघांचा साखरपुडा येथील मोतीमहलमध्ये करण्यात आला.