महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणजेच रमाबाई आंबेडकर यांचा इतिहास आजवर अनेक चित्रपट, मालिकेतून पाहायला मिळाला आहे. पण या बहुतेक कलाकृतीमधून त्यांना दुःखी, कष्टी, शेण काढणारी, गौऱ्या थापणारी रमाई दाखवली आहे. खरं तर रमाईं धाडसी, उत्तम वक्त्या होत्या. आपल्या पतीला विदेशात मनिऑर्डर करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांचा हाच धाडसी इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी अभिनेत्री प्रियांका उबाळे हिने मोठी मेहनत घेऊन एक कलाकृती तयार केली. या कलाकृतीसाठी प्रियांकाने स्वतःच अभिनेत्री, निर्माती, लेखन आणि दिग्दर्शनाची भूमिका साकारली. पैशांअभावी तीला अनेक अडचणी आल्या पण या सर्वांवर मात करत प्रोजेक्टरवर ‘रमाई’ महाराष्ट्राच्या खेडोपाडी पोहोचवण्याचे काम तिने केले.
मूळची परभणीच्या असलेल्या प्रियांका उबाळे हिने बाबो, साता जलमाच्या गाठी, प्रेमवारी, माझ्या नवऱ्याची बायको अशा चित्रपट, मालिकांमधून काम केले आहे. ‘मी रमाई’ हे नाटक दिल्लीत व्हावे अशी तिची इच्छा होती. त्यासाठी ती वेळेत तिथे पोहोचली. पण काल अचानकपणे हे नाटक सुरू होण्याआधी तिच्या प्रकृती खालावली. आपल्यामुळे हे नाटक रद्द होऊ नये म्हणून तिने जवळच्याच छोट्या दवाखान्यात उपचार सुरू केले. तब्येतीत सुधारणा होईल याची तिला खात्री होती. आयोजकांनी आपल्यावर विश्वास ठेवून ही संधी दिली त्यामुळे प्रियांकाला काहीही करून हे नाटक करायचे होते. पण आज अचानकपणे प्रियांकाने दिलगिरी व्यक्त करत नाटक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबद्दल प्रियांका म्हणते की, ” सगळ्यांना कळवण्यात खूप दुःख होत आहे की, आजवर तुम्ही माझ्या ‘मी रमाई’ ह्या रमाई प्रोजेक्टला खूप प्रेम दिलं आहे, पण काही तांत्रीक कारणास्तव हा प्रवास आज थांबला आहे…माफी असावी”. असे म्हणत तिने जनतेची माफी मागितली आहे. ” मी रमाई” ह्या प्रोजेक्टला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल तिने आभार मानले आहेत. रमाई प्रोजेक्ट तांत्रिक कारणास्तव बंद पडला त्यामुळे रमाईचा प्रवास थांबला अशी ती जाहीर करताना दिसते. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.