लग्नाच्या ९ व्या वाढदिवशी अभिनेता अभिजित खांडकेकर याने पत्नी सुखदा सोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतुन अभिजित खांडकेकर याने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. माझिया प्रियाला प्रीत कळेना या झी मराठीच्या मालिकेतून अभिजित खांडकेकर याने छोट्या पडद्यावर पाऊल टाकले होते. मी पण सचिन, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, बाबा, मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटात त्याला अभिनयाची संधी मिळाली. अभिनयासोबतच अभिजित सूत्रसंचालन खूप उत्स्फूर्तपणे निभावताना दिसतो.

झी गायरव पुरस्कार असो किंवा महाराष्ट्राचा सुपरस्टार हा रिऍलिटी शो अशा माध्यमातून त्याने सुत्रसंचालनाची धुरा अगदी चोख बजावलेली पाहायला मिळाली. अभिजितची पत्नी सुखदा देशपांडे खांडकेकर ही देखील नाट्य तसेच मालिका अभिनेत्री आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई या सोनी टीव्हीवरील हिंदी मालिकेतून सुखदाने द्वारकाबाईची व्यक्तिरेखा साकारली आहे. बाजीराव मस्तानि या बॉलिवूड चित्रपटात सुखदाने महत्वाची भूमिका निभावली होती. हिंदी चित्रपट, हिंदी मालिका तसेच हिंदी रंगभूमीवरील अभिनेत्री असण्यासोबतच सुखदाने विजय केंकरे यांच्या ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ आणि मकरंद देशपांडे यांच्या ‘शेक्सपिअरचा म्हातारा’ या मराठी नाटकातून काम केलं होतं. ‘देवदास’, ‘कनुप्रिया’, ‘डूबधान’, ‘धारा की कहानी’ आणि ‘उमराव’ अशा हिंदी नाटकांमध्येही तिनं काम केलं आहे. तिचं ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ हे नाटक विशेष गाजलं होतं. अभिजित खांडकेकर याला त्याच्या पत्नीचा अभिमान आहे. तुझी बायको मराठी सृष्टीत दिसत नाही यावर त्याने उत्तर दिलं होतं की,’ मी तुमच्यासमोर मालिकेतून येतो मला तुम्ही फुकट पाहू शकता मात्र माझ्या पत्नीला पाहण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं’… सुखदा पृथ्वी थिएटर्सशी जोडली गेली असल्याने अनेक उत्तमोत्तम हिंदी नाटकांमधून तिने अभिनय साकारला आहे. अभिनयासोबतच सुखदा उत्कृष्ट नृत्यांगना आहे.

एका कॉमन फ्रेंडच्या मार्फत सुखदा आणि अभिजित खांडकेकर यांची ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. १ फेब्रुवारी २०१३ रोजी अभिजित आणि सुखदा यांचा प्रेमविवाह झाला आहे. लग्नाच्या ९ व्या वाढदिवशी सुखदाने एक पोस्ट शेअर करत हा आनंद द्विगुणित केला आहे. ती म्हणते ” अंकशास्त्रात, संख्या नऊ पूर्णत्व दर्शवते, कारण ती एकक-अंकी संख्यांची शेवटची आणि मूल्यात सर्वोच्च आहे. हे प्रतीकात्मकपणे शहाणपण आणि अनुभवाच्या कळसाचे प्रतिनिधित्व करते आणि शेवट आणि नवीन सुरुवातीच्या उर्जेने गुंजते.मी या सगळ्याचा प्रतिध्वनी करत आहे!’शेवटचा’ आनंद घेत आहे आणि ‘नवीन सुरुवात’ साठी खूप उत्साही आहे. अभिजीत तुला नवव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर इकडे अभिजित खांडकेकर याने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पत्नी सुखद खांडकेकर हिला शुभेच्छा दिल्या आहेत.