माझी तुझी रेशीमगाठ या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत सिमी काकू म्हणजेच सीमा चौधरी हे पात्र काहीशी विरोधी भूमिका दर्शवणारे आहे. येत्या काळात यश आणि नेहाच्या लग्नाबाबत सीमा काकू काय भूमिका घेणार हे पाहणे रंजक ठरणार हे नक्की. सीमा काकूंची ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री “शीतल क्षीरसागर” यांनी. तुम्हाला आठवत असेल झी मराठीच्याच का रे दुरावा या लोकप्रिय मालिकेत देखील त्यांनी विरोधी भूमिका निभावली होती. का रे दुरावा मालिकेतील शोभाच्या भूमिकेने त्यांना नवी ओळख मिळाली होती. आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

लहानपणापासून आपल्या मनावर चित्रपटांचा पगडा असतो त्या ग्लॅमरस दुनियेचं आकर्षण तेव्हापासूनच अभिनेत्री व्हावं असं शीतल क्षीरसागर यांना वाटू लागलं होतं. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी मासुम हा हिंदी चित्रपट पाहिला त्यावेळी मला ह्या मुलीची भूमिका का नाही दिली? असं आई वडिलांना निरागस भावनेने त्यांनी विचारलं होतं. तेव्हापासून अभिनयाची आवड निर्माण झाली. मग नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली, नाटकांतून काम केलं पुढे अनेक जागतिक दर्जाच्या कलाकारांचे आत्मचरित्र वाचले त्यातून प्रेरणा मिळत गेली. कॉलेजमध्ये असताना नाट्यस्पर्धा गाजवल्या. १९९९ साली रात्र आरंभ हा पहिला मराठी चित्रपट त्यांनी अभिनित केला. त्यानंतर ‘एक होती वादी’ हा अधोरेखित करणारा चित्रपट त्यांच्या वाट्याला आला कारण या चित्रपटातली वादी ही प्रमुख भूमिका तितकीच आव्हानात्मक होती , वादी मूकी असल्याने चित्रपटात तिला एकही संवाद नव्हता केवळ चेहऱ्यावरील हावभावावरूनच तो अभिनय साकारायचा होता. त्यामुळे या भूमिकेला एक कौतुकाची थाप अनेक दिग्गज कलाकारांकडून मिळाली होती. एक होती वादी या चित्रपटाला महाराष्ट्र शासना सह तब्बल ५३ पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे आयुष्यातला उल्लेखनीय चित्रपट म्हणून त्या या चित्रपटाकडे पाहतात.

आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात, अनेक यश अपयश पचवलेले असतात मात्र या सर्वाला सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन मी कायम ठेवला आहे असं त्या म्हणतात. गेल्या २० ते २२ वर्षांपासूनचा त्यांचा मालिका तसेच चित्रपट सृष्टीतील प्रवास उल्लेखनीय असाच ठरलेला आहे. अजूनही त्या अविवाहित आहेत पण त्या एकट्या मुळीच नाहीत त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याचा उपभोग मी घेते असं त्या म्हणतात. क्वीन मेकर , रणांगण हे नाटक का रे दुरावा, एक होती राजकन्या, आई कुठे काय करते अशा अनेक मालिकेतून त्यांच्या विरोधी तसेच विनोदी अशा अभिनयाचे विविध पैलू उलगडणारे ठरले आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतूनही त्या अशाच धाटणीची भूमिका निभावताना दिसत आहेत. या भूमिकेसाठी शीतल क्षीरसागर यांना मनःपूर्वक शुभेच्छा…