मनोरंजनविश्वात मोठमोठय़ा कलाकारांचा फॅन क्लब असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. पण मालिका, सिनेमा, नाटक, वेबसिरीज किंवा अगदी काही सेकंदाची जाहिरात असो, त्यामधील बालकलाकार ही छोटा पॅकेट बडा धमाका असतात. त्यात आता भर पडली आहे ती सोशलमीडियावरील व्हिडिओ आणि रिल्सची. कॅमेरासमोर बिनधास्तपणे वावरणारी आणि सहजसुंदर अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही बच्चेकंपनी म्हणजे मनोरंजनाचा हुकमी एक्का बनली आहेत. सध्या टीव्हीइंडस्ट्रीत ज्या छोटय़ाशा परीची चर्चा आहे त्या मायरा वायकूळच्या घरी एक नवी पाहुणी आली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील एका एपिसोडमध्ये याच परीने नुकतेच एक चित्र काढले ज्यामध्ये ती आणि तिची आई नेहा यांच्यामध्ये तिला तिसरं कुणी नको आहे असं ती म्हणाली.

मालिकेत सध्या हा टवीस्ट सुरू आहे. पण याच परीने प्रत्यक्ष आयुष्यात तिच्या फॅमिलीत या नव्या पाहुणीचे स्वागत केले आहे. आणि ती नवी पाहुणी आहे नवीकोरी इलेक्ट्रीक कार. मायरा वायकूळची आई श्वेता यांनी त्यांच्या इन्स्टापेजवर नव्या गाडीसोबत मायराचा फोटो शेअर केला आहे. अवघ्या चार वर्षांच्या मायरा वायकूळने निरागस अभिनयाने वेड लावलं आहे. खरंतर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकण्यापूर्वीच मायरा वायकूळ हे नाव नेटकरयांना माहिती होतं. केवळ नावच नाही तर मायराज् वल्र्ड या तिच्या यूटय़ूब चॅनेलवरून ती तुफान लोकप्रिय झालीच होती. सोशलमीडियावर सतत अॅक्टीव्ह असलेल्या मायराचे हे चॅनेल तिचे आईबाबा हँडल करत असले तरी स्क्रिनवरच्या मायराच्या धमालमस्तीला लाखो लाइक्स आणि कमेंट मिळत असतात. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी या भूमिकेला अगदी प्रोमोपासूनच लोकप्रियता मिळाली. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासारख्या स्टारसोबत काम करताना मायरा इतकी सहजपणे वावरते की अनेक मुलाखतींमध्ये श्रेयस आणि प्रार्थना हे मायराकडूनच आम्ही खूपदा शिकतो असं सांगतात.

मायरा सतत तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशलमीडियावर शेअर करत असते. आता तिच्या घरी आलेल्या नव्या कारचे फोटोही तिने शेअर केले आणि तिच्या चाहत्यांनी मायरा आणि तिच्या फॅमिलीवर अभिनंदनाचा वर्षावही केला. सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे आजकाल इलेक्ट्रीक बाइक , इलेक्ट्रीक कार खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. हीच गरज ओळखून मायराच्या कुटुंबीयांनी इलेक्ट्रीक कार खरेदी केली. कार खरेदी करताना मायराही त्यांच्यासोबत होती आणि या नव्या पाहुणीचे स्वागतही मायराने दणक्यात केले. गेल्या महिन्यातच मायराने फॅमिली ट्रीप केली. तर त्याआधी मामाच्या लग्नातही खूप धमाल केली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत असतानाच मायराला एका अल्बमसाँगचीही ऑफर आली असून आईविना मला करमत नाही या गाण्यात मायरा दिसणार आहे. तर सध्या तरी मालिकेत परी आणि तिची आई नेहा यांच्या फॅमिलीत येण्यासाठी तिचा फ्रेंड यश धडपडत आहे. पण आपल्या दोघीत कुणीच नको म्हणणारी पडदय़ावरची परी खरया आयुष्यात मायरा बनून नव्या इलेक्ट्रीक कारच्या रूपात घरी आलेल्या पाहुणीने चांगलीच खूश आहे.