फारच कमी दिवसात माझी तुझी रेशीमगाठ मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यश आणि नेहा यांच्यात होणारी मैत्री आणि नेहाची मुलगी ‘परि’चा निरागसपणा देखील प्रेक्षकांना खूपच भावला आहे. या मालिकेत शेफालीचे पात्र देखील ५०० करोडचा नवरा मिळवण्यासाठी परीला आवाहन करताना दिसते. परि जे काही म्हणते ते अगदी खरं होतं असा समज या मालिकेत दाखवला आहे. त्यामुळे ही शेफाली आपल्याला ५०० करोडचा नवरा मिळावा म्हणून परीच्या मागे लागलेली दिसत आहे. शेफालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री बद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत शेफालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “काजल काटे”. काजल काटे मूळची नागपूरची. अभिनयाची आवड तिला कॉलेजमध्ये असल्या पासूनच होती. नागपूर येथे त्यांच्या नाटकाच्या ग्रुपने ठीक ठिकाणी नाट्यपथकं आयोजित केली होती त्यातून नागरिकांमध्ये जनजागृती घडवण्याचे काम त्यांनी केले होते. शिवाय विविध नाट्य स्पर्धेत देखील ती नेहमीच सहभागी होत असे. नाटकातून काम करत असताना झी मराठी वाहिनीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत तिला अभिनयाची संधी मिळाली. झी युवा वरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत तिने मोगराची भूमिका बजावली. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून तिने आयेशा बेगम हे पात्र साकारले होते. काजल काटे २०१९ साली प्रतीक कदम सोबत विवाहबद्ध झाली. प्रतीक कदम हा फिटनेस ट्रेनर आहे. काजलची थोरली बहीण “स्नेहा काटे शेलार” ही देखील मराठी हिंदी मालिका अभिनेत्री आहे. स्नेहा काटे शेलार ही ‘स्नेहा अशोक मंगल’ या नावाने ओळखली जाते. सध्या अँड टीव्ही वरील ‘एक महानायक डॉ बी आर आंबेडकर’ या मालिकेतून जिजाबाईची भूमिका साकारत आहे.

काजल काटे हीचा पती प्रतीक कदम ह्याच्या बद्दल अनेकांना काही खास गोष्टी माहित नसतील. मुंबई इंडियन्स ह्या आयपीएल सामन्यातील टीमचा तो एक महत्वाचा भाग आहे. प्रतीक गेली कित्तेक वर्ष मुंबई इंडियन्स टीमला फिटनेसचे प्रशिक्षण देतोय. मुंबई इंडियन्स टीमच्या फिटनेसवर तो चांगलं प्रशिक्षण देताना पाहायला मिळतो. शेफाली साकारणारी त्याची पत्नी अभिनेत्री काजल काटे हि देखील अनेकदा आयपीएल सामने पाहायला जाते त्यावेळी मुंबई इंडियन्स टीम सोबतचे बरेचसे फोटो ती सोशिअल मीडियावर देखील अपलोड करताना पाहायला मिळते. पण सध्या हे सामने भारताबाहेर दुबई इथे खेळले जात असल्यामुळे आणि तिची सिरीयल मुंबईत सुरु असल्याने तिला जाणे शक्य होत नसले तरी पती प्रतीक तिच्या मालिकेतील कामाचं कौतुक करताना पाहायला मिळतोय. काही दिवसापूर्वीच त्याने मालिकेतील तिच्या सीनचा एक व्हिडिओ देखील मोबाईलने शूट करून सोशिअल मीडियावर अपलोड केला आहे.