माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत लवकरच नेहा यशला आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. यशने जेसीकासोबत लग्न करावे म्हणून नेहाने आग्रह धरलेला असतो मात्र जेसीकाचे विचित्र वागणे पाहून ती आता स्वतःच यशवर प्रेम असल्याचे जाहीर करणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून जेसीका यशला फुलांचा गुच्छ देऊन प्रपोज करते मात्र तिचे हे वागणे न पटल्याने नेहा यशची कानउघडणी करताना दिसते आणि त्याचक्षणी ती प्रेमात असल्याचे जाहीर करते. यानंतर मात्र जेसीकाचे पात्र या मालिकेतून निरोप घेताना दिसणार आहे. जेसीकाची भूमिका अभिनेत्री जेन कटारिया हिने बजावली आहे. जेन कटारिया ही मॉडेल तसेच तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे.

मिस इंडियाच्या सौंदर्य स्पर्धेत जेनने दोन वेळा सहभाग दर्शवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून जेसीका भारतात स्थिरस्थावर झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे हिंदी भाषा आता तिला चांगली अवगत झाली आहे. माझी तुझी रेशीमगाठ ही जेसीकाची पहिलीच मराठी मालिका आहे. त्यामुळे मराठी भाषा शिकण्याची तिला खूप ईच्छा आहे. मालिकेत तिला हिंदी भाषेतून डायलॉग मिळाले आहेत. जेनचा मुलगा रोमन कटारिया हा देखील एक बालकलाकार म्हणून कार्यरत आहे. रोमन त्याच्या आई सोबत माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या सेटवर येत असतो. रमानला डान्सची आवड असून जाहिरात तसेच चित्रपटातूनही त्याने काम केले आहे. Mersal या दाक्षिणात्य चित्रपटात रोमनने एक छोटीशी भूमिका साकारली होती. एका कॅफेमध्ये चित्रपटाचा नायक गेला असता चिमुकल्या जादूगारासोबत त्याची भेट होते. ही छोट्या जादूगाराची भूमिका रोमनने साकारली होती. त्रिशा या दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमन एका लायन हनीच्या जाहिरातीत झळकला होता. त्यामुळे चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रात तो आपल्या आईप्रमाणे हळूहळू जम बसवताना दिसत आहे.

नुकतीच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच मायरासोबत त्याची छान गट्टी जमली आहे. रोमनला हिंदी भाषेचे ज्ञान आहे आणि तो हिंदी भाषेतून खूप छान संवाद देखील साधू शकतो. जेनच्या घरी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा बोलल्या जातात आणि आता त्यांना मराठी भाषेची देखील ओढ लागली आहे. रोमनची आई जेन कटारिया हिची देखील संकर्षण, श्रेयस आणि प्रार्थना सोबत मैत्री झाली आहे. नुकतंच जेन कटारिया हिने तिच्या सोशिअल मीडिया अकाउंटवर मायरा आणि तिचा मुलगा जेनला आणि तिचा मुलगा रोमन ह्यांची गट्टी जमल्याचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. मायरा देखील या मालिकेत येण्याआधीच सोशिअल मीडिया स्टार म्हणून ओळखली जात होती ह्या मालिकेमुळे तिला अमाप प्रसिद्धी देखील मिळाली आहे. जेन कटारिया हिचा मुलगा रोमन कटारियाला अभिनय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…