झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशच्या घरी सिम्मी काकूंनी पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत नेहा देखील येणार असल्याने तिची नाराजी कशी दूर करायची याचा विचार यश करत असतो. त्याचवेळी पार्टीत सिम्मी काकू यशसोबत एक वाईट कृत्य घडवून आणण्याच्या तयारीत असलेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेचा पुढचा भाग प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ठरणार आहे. मालिकेत नेहाच्या घराजवळ एक कुटुंब राहतं त्यातील गुड्डी हे पात्र तितकेच मजेशीर असलेलं पाहायला मिळतं.

परीसोबतची गुड्डीची धमाल मस्ती प्रेक्षकांना देखील खूपच भावली आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवलेल्या गुड्डी या पात्राबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात. मालिकेतली गुड्डी हे विनोदी पात्र साकारले आहे अभिनेत्री “प्रणाली ओव्हाळ” हिने. प्रणालीचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले. आयइएस दिगंबर पाटकर विद्यालयातून तसेच सिद्धार्थ कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे. अभिनयाची आवड असल्याने प्रणालीने कॉलेजमध्ये असताना नाटकांमधून काम केले. पुढे अविरत नाट्य संकुलशी ती जोडली गेली. यातून अनेक नाटकांमधून तिला झळकण्याची संधी मिळाली. नाटकांमधून काम करत असतानाच तिला मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. झी युवा वरील डॉक्टर डॉन या मालिकेत तिने स्नेहाची भूमिका साकारली होती. मालिकेतून प्रथमच कॅमेऱ्यासमोर आल्याने खूप काही शिकण्याची संधी मिळाली असे ती म्हणते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून तिच्या भूमिकेला तसा बराचसा वाव मिळालेला दिसून आला.

यश, नेहा आणि परी सोबत तिचे बरेचसे सिन मालिकेतून पाहायला मिळाले. हे पात्र साकारत असताना श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने ती भलतीच खुश आहे. अर्थात प्रणालीने तिची भूमिका उत्कृष्टपणे निभावली असल्याने मालिकेत तिचे बरेचसे सीन्स धमाल उडवताना दिसतात पण वेळप्रसंगी ती परीला संजवताना देखील दिसली त्यामुळे हे पात्र अधिकच खुलताना दिसले. गुड्डीच्या भूमिकेसाठी प्रणाली ओव्हाळ हिचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…