काही दिवसांपूर्वी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील अभिनेत्री धनश्री भालेकर हीची फसवणूक झाली असल्याचे समोर आले होते. याबाबत गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर सतत पाठपुरावा करताना दिसत होती . दरम्यान फसवणूक झाल्या प्रकरणी तिने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी धनश्रीला न्याय मिळाला असून खात्यातून गेलेले सर्व पैसे तिला पुन्हा मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. या संदर्भात तिने सर्वांचे आभार मानले आहेत आणि इतरांना सतर्क राहण्याचे देखील तिने आवाहन केले आहे. याप्रकरणी धनश्री म्हणते कि, मी मनापासून पोलिसांचे आभार मानते आणि तुमचे देखील आभार मानते. आपल्यासोबत अशी जर फसवणूक झाल्याची घटना घडली असेल तर आवाज उठवला पाहिजे आपल्याला सपोर्ट करणारी लोकं आहेत पण आपणच पहिलं पाऊल जर नाही उचललं तर कसं शक्य होणार?

त्यामुळे कृपा करून तुमच्यासोबत फसवणूक झाली असेल तर एफआयआर दाखल करा. पोलीस, प्रशासक सगळे आपली मदत करतील. आपण जर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल नाही केली तर ह्या अशा फसव्या लोकांचंही तितकंच फावत. ह्या अशा लोकांना अद्दल घडवणं खूप जरुरीचं आहे, आणि आपले गेलेले पैसे देखील परत मिळवणं महत्वाचं आहे. हे सर्वत्र व्हायरल होऊ द्या करणं फ्रॉड झाला की आपले पैसे मिळतात हा माझा अनुभव आहे.धन्यवाद. असे म्हणत धनश्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये एका वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी धनश्रीला विचारण्यात आले होते. बालाजी टेलिफिल्म्सकडून तिला ही ऑफर आली होती. कास्टिंग बालाजी टेलिफिल्म्स डॉट कॉम या इमेल आयडीवरून तिला यासंदर्भात सिलेक्शन झाले असा मेल आला होता. तिच्याबाबतची माहिती टॅलेंट ट्रॅक ह्यांच्याकडून मिळाली असे तिला सांगण्यात आले. बालाजी टेलिफिल्म्स असल्याने धनश्रीने या गोष्टीवर विश्वास ठेवला. मुंबई आणि हैदराबाद येथे या वेबसिरीजचे शूटिंग होणार आणि ते झी 5 वर दिसणार असे तिला सांगण्यात आले होते. त्यासाठी डॉक्युमेंटस पाठवून तिला मुंबई ऑफिसला जावे लागेल असे सांगितले. परंतु मुंबई ऑफिस बंद पडत असल्याने ह्याची प्रोसेस हैद्राबादलाच होईल असे तिला कळवण्यात आले. हैद्राबादला विमानाने येण्यासाठी ‘बालाजी २०’ असा एक प्रोटोकॉल तिला दिला गेला आणि तिकीट बुक करण्यासाठी सांगितले.

यागोदरही धनश्रीने असे प्रोजेक्ट्स केले होते त्यामुळे तिला याबाबत काहीच शंका आली नाही. परंतु तिकीट बुक करायच्या वेळेस प्रोसेस होत नसल्याचे तिने त्यांना कळवले. इंडिगोकडून तिकीट बुक केले आहे मात्र त्याचे पेमेंट पेंडिंग आहे असा एक रेकॉर्ड कॉल धनश्रीला आला. त्यांनी धनश्रीला एक नंबर पाठवून २२ हजार ३४८ रुपये एवढी विमानाच्या तिकीटाची रक्कम गुगलपे करण्यास सांगितली. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी गुगलपे करताना स्क्रीनवर इंडिगोच नाव समोर आलं आणि तुमची सीट बुक झाली असा एक मेल तिला आला. मात्र ह्या प्रोसेस मध्ये काही वेळ जाईल असे तिला सांगण्यात आले. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजताची फ्लाईट होती त्यामुळे ही प्रोसेस लवकर कन्फर्म व्हावी अशी मागणी तिने केली होती. आधल्या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत तिने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असता कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने तिची फसवणूक झाली असल्याचे तिला वाटले. तेव्हा तिने याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती.