माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. यश नेहाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे त्यात त्याला समीरची देखील मोठी साथ मिळत आहे. यश आणि समीरची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना तर विशेष भावली आहे. मालिकेतला हा ट्रॅक प्रेक्षकांना आवडला असून यश आणि नेहा कधी लग्न करतात याची उत्सुकता निर्माण झाला आहे. यासर्व घडामोडी घडत असताना मधल्या काळात प्रेक्षकांनी यशच्या आजोबांना देखील मिस केले होते.

मालिकेव्यतिरिक्त मोहन जोशी दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्ये बिझी होते त्यामुळे मालिकेत त्यांचा वावर काही काळापुरता थांबला होता. आता पुन्हा एकदा ते मालिकेतून सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. मालिकेतील पिकूचूचे पात्र साकारणारा बालकलाकार वेद आंब्रे हा देखील अशाच एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळत आहे. वेद सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेसोबतच आणखी एका मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. सोनी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही ऐतिहासिक मालिका सुरू आहे. या मालिकेत बेंदनूरची राणी चेन्नम्माच्या व्यक्तिरेखेची नुकतीच एन्ट्री झाली आहे. हे ऐतिहासिक पात्र साकारले आहे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने. याच मालिकेत बसवप्पाचे पात्र साकारले आहे वेद आंब्रे या बालकलाकाराने. त्यामुळे सध्या वेद माझी तुझी रेशीमगाठ आणि स्वराज्य सौदामिनी ताराराणी या दोन्ही मालिकेतून पाहायला मिळत आहे. वेदने आजवर अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका बजावल्या आहेत. वेदने कलाघर अभिनव कार्यशाळेतून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

आई कुठे काय करते या मालिकेत तो ज्युनिअर यशच्या भूमिकेत दिसला होता. या मालिकेखेरीज गाथा नवनाथांची, घाडगे अँड सून, ग्रहण, स्वराज्यजननी जिजामाता, सिंधू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, विठू माऊली, तू माझा सांगाती, लक्ष्मी सदैव मंगलम, ग्रहण, खुलता कळी खुलेना, लक्ष्य, सावधान इंडिया, अस्मिता, जाडुबाई जोरात, स्पेशल ५, आपला माणूस, कोडरेड, तलाश, अशा अनेक गाजलेल्या मालिकेतून तो नेहमीच प्रेक्षकांसमोर आला आहे. एवढ्या कमी वयात ढीगभर मालिका साकारणारा वेद हा बहुतेक एकमेव बालकलाकार असावा ज्याने आजवर मराठी सृष्टीतील बऱ्याचशा कलाकारांबरोबर काम केले आहे. या यशामागे निश्चितच त्याची मेहनत कामी आली असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या सर्व मालिकांमधून वेद आंब्रे हे नाव आज प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले आहे.