झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या विषेश पसंतीस उतरली आहे. मालिकेतील समीरची भुमिका निभावणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा काल १२ नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात…संकर्षण कऱ्हाडे हा मूळचा परभणी जिल्ह्यातला त्यामुळे त्याचा बोलण्यातला टोन प्रेक्षकांना नेहमीच भावलेला आहे. शाळेत असल्यापासूनच संकर्षण नाटकांमधून काम करत असे यासोबतच त्याचे बालपण मात्र भयंकर मजा मस्ती करण्यात गेले असल्याचे तो सांगतो.

सहज म्हणून मित्रांच्या, वर्गशिक्षकांच्या, नातेवाईक या सर्वांच्या नकळत त्यांना त्रास देणे हे त्याचे नेहमीचे काम होते. एकदा नाटकाच्या प्रयोगादरम्यान संकर्षण आणि त्याचा भाऊ अधोक्षज या दोघांनी मिळून एका मुलाला रूममध्ये कोंडून ठेवले होते. त्याच्या पात्राची एन्ट्री झाली तरीही तो स्टेजवर आला नाही म्हणून चालत्या प्रयोगातून एका मुलाने जाऊन त्याला शोधले होते. आज मागे वळून पाहताना आपण केलेल्या ह्या गमतीजमती आई वडिलांसाठी त्रासदायक ठरल्या असल्या तरी आजच्या घडीला एक यशस्वी कलाकार म्हणून आपल्या मुलांचा त्यांना अभिमान वाटतो आहे असे तो म्हणतो. पुण्यात डी वाय पाटील कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असताना महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोसाठी त्याने ऑडिशन दिली होती. त्यात संकर्षणला निवडण्यात आल्याने हा मोठा प्लॅटफॉर्म त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. त्यानंतर संकर्षण आभास हा, माझिया प्रियाला प्रीत कळेना, राम राम महाराष्ट्र अशा मालिका आणि कार्यक्रमातून तो प्रेक्षकांसमोर आला.

एकदा महेश मांजरेकर यांच्या घरी गेल्यावर तिथे त्याने एक पत्र ठेवलं होतं. त्यात त्याने लिहिलं होतं की, ” मी महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये होतो त्यावेळी तुम्हाला माझं काम आवडलं होत वाटलं तर मला सिनेमात घ्या.” संकर्षणने लिहिलेल्या ह्या पत्राची दखल घेतली गेली आणि महेश मांजरेकर यांच्या असिस्टंटकडून संकर्षणला फोन आला की तुम्हाला कोकणस्थ चित्रपटात महत्वाची भूमिका मिळत आहे. या संधीला संकर्षणने लगेचच आपला होकार कळवळा. या चित्रपटातील भूमिकेनंतर महेश मांजरेकर यांनी आणखी एका चित्रपटातून संकर्षणला काम दिले. नागपूर अधिवेशन हा चित्रपट संकर्षणकडे ओघानेच चालून आला यात तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. त्यानंतरचा त्याचा प्रवास पुढे यशस्वी वाटचाल करणारा ठरला. खोपा, देवशप्पथ, खुलता कळी खुलेना, आम्ही सारे खवय्ये , तू म्हणशील तसं अशा चित्रपट, मालिका तसेच नाटकातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अभिनयासोबतच संकर्षणने केलेल्या कविता प्रेक्षकांना तितक्याच भावलेल्या पाहायला मिळतात कलाकार म्हणून तो जितका चांगला आहे त्याही पेक्षा तो मनमेळाऊ आणि माणुस म्हणून त्याही पेक्षा चांगला आहे असे अनेकांच मत आहे. एक उत्कृष्ट अभिनेता, लेखक, कवी आणि निवेदक अशा विविध कलाकृतीतून संकर्षण कऱ्हाडे नेहमीच प्रेक्षकांसमोर येत राहो हीच एक सदिच्छा…